राज्यातील ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी नियमावलीचा मसुदा ३० दिवस संकेतस्थळावर
मुंबई, दि. २६ : फडणवीस सरकारने
राज्यातील फ्लॅटधारकांच्या हक्कासाठी आज एक ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. जमिनीच्या ‘सातबारा’च्या धर्तीवर स्वतंत्र ओळख व फ्लॅटधारकांना कायदेशीर हक्क देणारे ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ देण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. यामुळे राज्यातील अंदाजे ७ कोटी सदनिकाधारकांना दिलासा मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, या नियमावलीचा मसुदा (ड्राफ्ट) आज महसूल विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यावर ३० दिवस नागरिक व तज्ज्ञांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील दोन महिन्यांत नियमावली अंतिम करून ही योजना राज्यभर लागू केली जाईल, असे अशी माहिती महसूलमंत्री बावनकुळे यांनी पत्रकारांना दिली. यावेळी महसूल राज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते.
ग्रामीण भागात जसा जमिनीसाठी सातबारा आणि शहरी भागात मिळकत पत्रिका (CTS) असते, तशी स्वतंत्र ओळख व मालकी हक्काचा ठोस अभिलेख फ्लॅटधारकांकडे नव्हता. ही पोकळी भरून काढण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील नियमांमध्ये सुधारणा करण्यात येत आहे.
D1 आणि D2 नमुन्यांत स्वतंत्र नोंदी
नव्या रचनेनुसार, नागरी भागातील इमारतींसाठी ‘D1’ आणि ‘D2’ असे नमुने निश्चित करण्यात आले आहेत.
- D1 नमुना : मूळ मालक, जमीन, मंजूर बांधकाम आराखडा, खुली जागा, रस्ते आणि सामाईक क्षेत्राचा सर्वसमावेशक मुख्य अभिलेख यामध्ये राहील. सामाईक जागेवर सर्वांचा हक्क नोंदवला जाईल.
•D2 नमुना : प्रत्येक फ्लॅटधारकाचे नाव, सदनिका क्रमांक, मंजूर क्षेत्रफळ आणि संबंधित हक्कांची स्वतंत्र नोंद यामध्ये असेल.
- ग्रामीण भाग : ग्रामीण भागातील इमारतींसाठी ‘IA – गाव नमुना ७ क’ आणि ‘IB’ गाव नमुना ७ ड अशा स्वरूपात अभिलेख तयार केले जातील.
•डिजिटल कार्ड आणि सर्व विभागांचे एकत्रिकरण
संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन राबवली जाणार असून, मंजुरीनंतर फ्लॅटधारकांना एटीएम कार्डप्रमाणे खिशात ठेवता येईल असे डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळेल. यासाठी नोंदणी व मुद्रांक विभाग, सहकार विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, नियोजन प्राधिकरणे (सिडको, नैना, महापालिका, नगरपालिका), महारेरा आणि भूमी अभिलेख विभागांचे API माध्यमातून एकत्रीकरण केले जाणार आहे. इमारतीचा पुनर्विकास झाल्यास जुन्या नोंदी बंद करून नवीन आराखड्यानुसार अद्ययावत नोंदी केल्या जातील.
•बोजे, कर्ज आणि व्यवहार सुलभ होणार
फ्लॅटवर बँकेचे कर्ज, गहाणखत, मालमत्ता कर किंवा सोसायटीची थकबाकी, न्यायालयीन निर्बंध अथवा शासकीय देणी असल्यास त्याची थेट नोंद संबंधित प्रॉपर्टी कार्डवर होईल. बिल्डरचे कॉमन कर्ज मुख्य नोंदीवर तर वैयक्तिक कर्ज संबंधित सदनीकाधारकाच्या कार्डवर दिसेल. अधिकृत बांधकाम, मंजूर नकाशा आणि संबंधित कागदपत्रे असलेल्या प्रकल्पांनाच हे कार्ड मिळणार असून, अनधिकृत बांधकामांना यातून वगळण्यात आले आहे.
•पुनर्विकास आणि कन्व्हेयन्सबाबत स्पष्टीकरण
कन्व्हेयन्स आणि पुनर्विकासाच्या प्रश्नावर बोलताना महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले की, डीम कन्व्हेयन्सची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महसूल, नगरविकास आणि सहकार विभागाची कार्यपद्धती (SOP) तयार करण्यात येत आहे. तसेच, या मसुद्याचा अभ्यास करून नागरिकांनी आणि माध्यमांनी जास्तीत जास्त सूचना द्याव्यात, जेणेकरून नियमावली अधिक अचूक तयार करता येईल, असे आवाहनही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.ML/ML/MS