आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत श्री गणेश आखाड्याची दमदार कामगिरी!
ठाणे दि २७ : मुंबई विद्यापीठ आणि गजाननराव पांडुरंग पाटील महाविद्यालय, कोनगाव (ता. भिवंडी) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ आणि २६ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील मल्लांनी उल्लेखनीय कामगिरी करत आखाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या स्पर्धेत आखाड्यातील कुस्तीपटूंनी तब्बल तीन सुवर्णपदके आणि एका रौप्यपदकाची कमाई करत आपल्या गुणवत्तेची आणि मेहनतीची चुणूक दाखवून दिली.
या स्पर्धेत 🥇१२५ किलो वजनी गटात पैलवान ओम जाधव,
🥇८६ किलो वजनी गटात पैलवान सूरज माने आणि
🥇५० किलो वजनी गटात महिला कुस्तीपटू कोमल पटेल यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदक पटकावले.
तर 🥈७४ किलो वजनी गटात पैलवान आदर्श शिंदे यांनी उत्कृष्ट कुस्तीचे प्रदर्शन करत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. या सर्व खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली.
पैलवान ओम जाधव याची वन मंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गणेश आखाडा भाईंदर चे संस्थापक गणेश नाईक आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्या उपस्थित तसेच त्यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली.
सुवर्णपदक विजेते ओम जाधव, सूरज माने आणि कोमल पटेल हे भाईंदर येथील अभिनव कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सचे विद्यार्थी असून, रौप्यपदक विजेते आदर्श शिंदे हे वसई येथील अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर खेळाडूंची आगामी आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे मीरा-भाईंदरच्या कुस्ती क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.
या स्पर्धेत श्री गणेश आखाड्याच्या कुस्तीपटूंनी वैयक्तिक पदकांची कमाई करण्याबरोबरच सांघिक यशातही मोलाचे योगदान दिले. विशेषतः पैलवान ओम जाधव आणि पैलवान सूरज माने यांच्या उत्कृष्ट खेळीमुळे भाईंदर येथील अभिनव कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स या महाविद्यालयाने मुलांच्या गटात द्वितीय क्रमांकाची चॅम्पियन ट्रॉफी पटकावली. वैयक्तिक सुवर्णपदकांसह महाविद्यालयाला मिळालेली ही सांघिक चॅम्पियन ट्रॉफी म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीचे आणि सांघिक कामगिरीचे फलित ठरले आहे.
या यशस्वी कुस्तीपटूंना आखाड्याचे मार्गदर्शक प्रा. वसंतराव यशवंत पाटील तसेच कुस्ती प्रशिक्षक पैलवान वैभव माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. नियमित सराव, शिस्त, मेहनत आणि प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर या खेळाडूंनी हे यश संपादन केले आहे.
श्री गणेश आखाड्याच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे कुस्ती खेळाचा प्रसार, प्रचार आणि नवोदित कुस्तीपटू घडविण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. विशेषतः सर्वसामान्य कुटुंबातील गुणवंत खेळाडूंना कुस्तीचे व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांना विद्यापीठ, राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी आखाडा प्रयत्नशील आहे. या खेळाडूंचे यश म्हणजे याच प्रयत्नांचे फलित असल्याची भावना व्यक्त होत आहे. ओम जाधव सध्या जाणता राजा कुस्ती केंद्र , लोणीकंद व सूरज माने क्रांती कारखाना , कुंडल येथे सराव करत आहेत.
ML/ML/MS