पंतप्रधान मोदी फक्त दिड लाख मताधिक्याने वाराणसीतून विजयी
वाराणसी, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘अबकी बार चारसो पार’ चा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून सलग तिसऱ्यांदा विजयी होत यशाची हॅट्रीक केली आहे. मात्र यावेळी त्यांचे मताधिक्य घटल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे उमेदवार अजय राय (Ajay Rai) यांचा दीड लाख मतांनी पराभव केला आहे. गेल्या दोन निवडणुकांतील विजयाची तुलना केली तर यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या मताधिक्यात घट झाली आहे.
गेल्या निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा यावेळी मोदींना कमी मते मिळाली आहेत. मागील निवडणुकीत पंतप्रधान मोदींना 6 लाख 74 हजार 664 मते मिळाली होती. या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना 6 लाख 11 हजार 439 मते मिळू शकली. तर गेल्या वेळी केवळ एक लाख 52 हजार 548 मते मिळवणारे काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांना यावेळी 4 लाख 59 हजार 084 मते मिळाली आहेत. पीएम मोदींनी अजय राय यांचा 1 लाख 52 हजार 355 मतांनी पराभव केला आहे.
मागील दोन लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीतून एकतर्फी विजय मिळवला. 2019 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना 6 लाख 74 हजार 664 मते मिळाली होती. समाजवादी पक्षाच्या उमेदवार शालिनी यादव यांना केवळ 1 लाख 95 हजार 159 मते मिळाली. काँग्रेसचे अजय राय यांना 1 लाख 52 हजार 548 मते मिळाली. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसीमध्ये 5 लाख 81 हजार मते मिळाली होती. त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा 2 लाख 9 हजार मतांनी पराभव केला. काँग्रेससह अन्य पक्षांच्या एकाही उमेदवाराला एक लाख मतेही मिळवता आली नाहीत. यावर्षी मात्र वाराणसीमधील मोदींचा करिष्मा काहीसा घटल्याचे दिसून येत आहे.
SL/ML/SL
4 June 2024