नगरसेवकांसाठी आता बायोमेट्रिक हजेरी!पालिका मुख्यालयात मशीन कार्यान्वित
मुंबई, दि ७: मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या उपस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याची मागणी पुढे आली आहे. भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी महापौर रितू तावडे यांना पत्र लिहून सर्वपक्षीय नगरसेवकांसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिका मुख्यालयातील भाजप पक्ष कार्यालयात नगरसेवकांसाठी बायोमेट्रिक हजेरी मशीन कार्यान्वित करण्यात आली आहे.
महापालिकेच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वाढावी, तसेच नगरसेवकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी या उद्देशाने ही मागणी करण्यात आल्याचे नार्वेकर यांनी पत्रात नमूद केले आहे. भाजप कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या प्रणालीमुळे उपस्थितीची अचूक नोंद ठेवणे शक्य झाले असून नगरसेवकांमध्ये वक्तशीरपणा वाढल्याचा दावा करण्यात आला आहे.
याच धर्तीवर महापालिकेच्या सर्वसाधारण सभांसाठीही बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली लागू करावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. अशा उपाययोजनांमुळे सभांमध्ये नगरसेवकांचा सक्रिय सहभाग वाढेल आणि प्रशासनाबद्दल जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल, असेही नार्वेकर यांनी म्हटले आहे.
नागरिक आपल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडून अधिक उत्तरदायित्वाची अपेक्षा करत असताना बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय सुशासनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरू शकतो, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.KK/ML/MS