रेल्वेच्या गलथान कारभारामुळे जोगेश्वरी–गोरेगाव परिसरात नागरिकांचे हाल; खा. संजय दिना पाटील आक्रमक
मुंबई, दि. ७ – मुंबईतील जोगेश्वरी पूर्व (रामनगर) आणि गोरेगाव पूर्व रेल्वे परिसरात सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्पांच्या कामामुळे नागरिकांचे जीवन अक्षरशः विस्कळीत झाले असून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या निष्काळजी व ढिसाळ कारभाराविरोधात संतापाची लाट उसळली आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या कामांमुळे परिसरात मोठमोठे खड्डे, साचलेले घाण पाणी, दुर्गंधी, धुळीचे साम्राज्य आणि मच्छरांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र रेल्वे प्रशासनाला याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत केंद्रीय रेल्वे समितीचे सदस्य तथा खासदार संजय दिना पाटील यांनी आमदार सुनिल प्रभू आणि नगरसेवक अंकीत सुनिल प्रभू यांच्यासह परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांच्या समस्या ऐकून घेत त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार संताप व्यक्त केला. मुंबईकरांना विकासाच्या नावाखाली

नरकयातना देण्याचे काम रेल्वे प्रशासन करत आहे. कामे सुरू केली जातात, पण ती वेळेत पूर्ण होत नाहीत. नागरिकांच्या आरोग्याची, सुरक्षिततेची व दैनंदिन आयुष्याची कोणतीही काळजी रेल्वे मंत्रालयाला उरलेली नाही, असा घणाघात खा. संजय दिना पाटील यांनी केला. गोरेगाव परिसरात रेल्वेच्या कामामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण पाणी साचले आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला असून परिसरात अस्वच्छतेमुळे दुर्गंधी पसरली आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक गटारे बंद अवस्थेत असून पावसाळा तोंडावर असताना रेल्वे प्रशासन मात्र निवांत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला.

चापनगर–डेल्टा हाऊस नाल्याची दुरवस्था, नाल्याची कमी झालेली रुंदी, अपुरी साफसफाई, रेल्वे परिसरातील धुळीमुळे वाढलेले प्रदूषण तसेच गोरेगाव पूर्व भागातील अनधिकृत पार्किंग यामुळे स्थानिकांचे जगणे कठीण झाले आहे. रेल्वेच्या प्रकल्पांमुळे नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असून प्रशासन फक्त कागदोपत्री कामे दाखवत असल्याची टीका देखील करण्यात आली. खा. संजय दिना पाटील यांनी या सर्व समस्यांचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या प्रश्नांबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची लवकरच प्रत्यक्ष भेट घेऊन या भागातील नागरिकांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईकरांच्या जीवाशी खेळणारा निष्काळजीपणा आम्ही सहन करणार नाही. नागरिकांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
परिसरातील नागरिकांनी देखील खा. संजय दिना पाटील यांच्या दौऱ्याचे स्वागत करत, प्रत्यक्ष मैदानात उतरून समस्या जाणून घेणारे लोकप्रतिनिधी आज दुर्मिळ झाल्याची भावना व्यक्त केली. नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे नेतृत्व म्हणून त्यांनी खा. संजय दिना पाटील यांच्यावर विश्वास व्यक्त केला.ML/ML/MS