डाळिंबाच्या नव्या वाणाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
सोलापूर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाचे प्रमाण कमी असलेल्या कोरडवाहू सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपिकाचा मोठा आधार आहे.सोलापूरातील डाळींब देशभर प्रसिद्ध आहेत. प्रक्रिया उद्योगमध्ये देखील येथील रसरशीत डाळींबांना मोठी मागणी आहे. या पिकाच्या उत्पादनाला अधिक चालना देण्यासाठी कृषी संशोधन केंद्राकडून गेली अनेक वर्ष सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांचे चांगले परिणामही आता दिसू लागले आहेत. सोलापुरातील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने संशोधित केलेल्या डाळिंबाच्या नव्या ‘सोलापूर अनारदाना’ या वाणाचे आज नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या कार्यक्रमात भारतीय कृषी संशोधन संस्थेअंतर्गत देशभरात कार्यरत विविध संशोधन संस्थांनी विकसित केलेली विविध फळे आणि पिकांचे 109 वाण प्रसारीत करण्यात आले. सोलापूर अनारदाना हे वाण शेतकऱ्यांसाठी डाळिंबाच्या शेतीत प्रगतिपथावरील एक मोठे आश्वासक पाऊल आहे. हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या हे वाण फायदेशीर ठरणार आहेच, पण प्रक्रिया उद्योगातही सोलापूर अनारदाना हे वाण उच्च गुणवत्तेच्या उत्पादनात एक नवा मापदंड निर्माण करेल.
संशोधन केंद्राने ‘सोलापूर अनारदाना’ हे खास प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरणारे पहिले डाळिंबाचे वाण संशोधित केले. संशोधन केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. दिनेश बाबू यांनी त्यासाठी योगदान दिले. गेल्या काही वर्षांपासून त्यावर काम सुरू होते. दोन वर्षांपूर्वी ते प्रायोगिक स्वरूपात त्याची प्रात्यक्षिकेही घेतली आहेत. महाराष्ट्रासह शेजारील राज्यांच्या कोरड्या, अर्ध-कोरड्या प्रदेशांसाठी ते फायदेशीर ठरेल.
नवी दिल्ली येथील संशोधन केंद्राच्या पुसा येथील ‘आयएआरए’च्या प्रक्षेपणात आज सकाळी हा कार्यक्रम पार पडला. संपूर्ण देशात डाळिंब प्रक्रियेसाठी शिफारस करण्यात येणारं पहिलेच वाण आहे. सध्याच्या स्थितीत अनारदाना तयार करण्यासाठी डाळिंबाच्या ‘नाना’ या जंगली जातीचा वापर केला जात होता.
‘सोलापूर अनारदाना’ची वैशिष्ट्ये
- उच्च-गुणवत्तेच्या अनारदाना (सुके डाळिंबाचे बी) उत्पादनासाठी हे वाण फायदेशीर.
- मऊ बियांमुळे, गडद लाल दाण्यांमुळे आणि उच्च रसामुळे त्याला विशिष्ठ ओळख.
- फळे मध्यम ते मोठ्या आकाराची मिळतात, ज्याचे वजन सुमारे 250 ते 300 ग्रॅमपर्यंत राहते.
- प्रत्येक झाडामध्ये दरवर्षी सरासरी 18 ते 20 किलो उत्पादन हमखास होते.
- या दाण्यांचा स्वाद गोड-आंबट आहे, ज्यामुळे ताजे सेवन, अनारदानामध्ये प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरते.
ML/ML/SL
11 August 2024