मुंबई विद्यापीठात करिअरच्या नव्या संधी उपलब्ध

 मुंबई विद्यापीठात करिअरच्या नव्या संधी उपलब्ध

मुंबई, दि. 18 : मुंबई विद्यापीठाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्राने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी नवे करिअर मार्ग खुले केले आहेत. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजीसारख्या अत्याधुनिक क्षेत्रात विशेष शिक्षण घेण्याची संधी आता बीई आणि बी.टेक विद्यार्थ्यांनाही उपलब्ध झाली आहे. इच्छुक बी.एस्सी., बीई आणि बी.टेक विद्यार्थी University of Mumbai च्या अधिकृत प्रवेश प्रक्रियेनुसार अर्ज करू शकतात. अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेले किंवा निकालाची प्रतीक्षा करणारे विद्यार्थीही अर्जासाठी पात्र आहेत. मात्र, प्रवेश निश्चित करताना निकाल सादर करणे आवश्यक राहील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 मे 2026 निश्चित करण्यात आली आहे.

यावर्षी प्रथमच संबंधित अभियांत्रिकी शाखांतील बीई आणि बी.टेक विद्यार्थ्यांना एम.एस्सी. (नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी) अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश देण्यात येत आहे. यामुळे पारंपरिक अभियांत्रिकी शिक्षणानंतर अत्याधुनिक संशोधन क्षेत्रात प्रवेश करणे सोपे होणार आहे. हा निर्णय उद्योगाच्या बदलत्या गरजांशी सुसंगत मानला जात आहे.

केंद्रात यावर्षी एम.एस्सी. सोबतच बी.एस्सी. (ऑनर्स), बी.एस्सी. (ऑनर्स विथ रिसर्च) आणि पीजी डिप्लोमा असे विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि करिअरच्या उद्दिष्टानुसार पर्याय निवडण्याची संधी मिळते. विशेष म्हणजे, हे अभ्यासक्रम संशोधनाभिमुख आणि उद्योगाभिमुख दोन्ही दृष्टीने उपयुक्त ठरणार आहेत.

या केंद्रात अत्याधुनिक प्रयोगशाळा, प्रगत उपकरणे आणि उद्योगाशी संलग्न प्रशिक्षण सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना नॅनोमटेरियल्स, स्मार्ट डिव्हाइसेस, सेन्सर्स, ऊर्जा साठवण प्रणाली, नॅनोमेडिसिन आणि नॅनो फॅब्रिकेशन यासारख्या विषयांमध्ये प्रत्यक्ष अनुभव मिळतो. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन सहकार्याची संधीही दिली जाते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *