हरिश्चंद्रगड प्लॅस्टिकच्या विळख्यात
अहिल्यानगर, दि. 19 : हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक व नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला असून, त्याच्या शिखरावरून दिसणारे कोकणकडा हे साहसी पर्यटनाचे मोठे आकर्षण आहे. मात्र अलीकडच्या काळात येथे प्लॅस्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढत असून पर्यावरण व जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
शिवनेरी ट्रेकर्स असोसिएशन’च्या वतीने गडावर नुकतेच तीन दिवसीय विशेष दुर्गस्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात त्यांना काही धक्कादायक गोष्टी आढळून आल्या.
या मोहिमेत 55 दुर्गप्रेमींनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. या मोहीमे अंतर्गत त्यांनी गडावरून तब्बल 125 हून अधिक गोण्या प्लॅस्टिकचा कचरा गोळा केला आहे. गडावरील मुख्य पायवाटा, हरिश्चंद्रेश्वर मंदिर परिसर, ऐतिहासिक पाण्याची कुंडे आणि सभोवतालच्या जंगल परिसरात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक कचरा आणि पाण्याच्या बाटल्या टाकल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे, गडावर दारूबंदीचे नियम लागू असतानाही, दुर्गप्रेमींना तब्बल 5 ते 6 गोण्या भरून दारूच्या काचेच्या बाटल्या सापडल्या आहेत. यामुळे गडाच्या पवित्र्याला आणि सुरक्षेला धक्का पोहोचत असल्याचे चित्र आहे.
प्रवासी व पर्यटकांकडून फेकल्या जाणाऱ्या बाटल्या, पिशव्या व वेष्टने किल्ल्याच्या परिसरात व जंगलात साचत आहेत.
कचऱ्यामुळे वन्यजीवांना धोका: प्राणी व पक्ष्यांनी प्लॅस्टिक खाल्ल्याने आरोग्य बिघडते.
जमिनी व पाण्याचे प्रदूषण: पावसाळ्यात हा कचरा पाण्यात मिसळून भूजल व नद्या दूषित करतो.
नैसर्गिक सौंदर्याला बाधा: कोकणकडा व मंदिर परिसरात प्लॅस्टिक कचरा दिसल्याने पर्यटनाचा दर्जा कमी होतो.