मुंबईच्या समुद्रातील तरंगता कचरा काढणार मानवरहित इलेक्ट्रिक बोट
मुंबई, दि. 19 : मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. गेटवे ऑफ इंडिया आणि बधवार पार्क परिसरात दोन मानवरहित विद्युत बोटी कार्यान्वित करण्यात आल्या असून, या बोटी दररोज सुमारे ८० ते ९० किलो तरंगता कचरा गोळा करतात. प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, वेष्टने आणि इतर कचरा समुद्राच्या पाण्यात तरंगताना आढळतो. हा कचरा मानवी प्रयत्नांनी गोळा करणे अत्यंत कठीण आणि वेळखाऊ काम होते. यावर उपाय म्हणून पालिकेच्या ए विभागाने थेट समुद्रात उतरून कचरा गोळा करणाऱ्या या दोन मानवरहित इलेक्ट्रिक बोटी कार्यान्वित केल्या आहेत.
या उपक्रमाचे मार्गदर्शन महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी व उपायुक्त किरण दिघावकर यांनी केले आहे. ‘ए’ विभागातील उपायुक्त चंदा जाधव व सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांच्या नेतृत्वाखाली या बोटी कार्यरत आहेत.
ही बोटी पूर्णपणे विजेवर चालणारी असल्यामुळे पर्यावरणपूरक आहेत. त्यामध्ये जीपीएस व वाहन वाहतूक व्यवस्थापन प्रणाली बसवण्यात आली आहे, ज्यामुळे मार्गक्रमण व सुरक्षिततेवर नियंत्रण ठेवता येते. समुद्रातील प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, वेष्टने यांसारखा तरंगता कचरा गोळा करणे मानवी प्रयत्नांनी कठीण होते; मात्र या बोटीमुळे ते काम अधिक प्रभावीपणे पार पडत आहे.
महत्त्वाचे म्हणजे या बोटी डिझेल किंवा पेट्रोलवर चालणाऱ्या जहाजांप्रमाणे सागरी पर्यावरणाला व जलचरांना कोणताही धोका निर्माण करत नाहीत. त्यामुळे मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे.
SL/ML/SL