डब्ल्यू.आय.टी. जैन टेम्पल येथे श्री जिनधर्म संस्कार शिबिरास जयकुमार गोरे यांची भेट
सोलापूर, दि.२६ : धार्मिक व शैक्षणिक परंपरेत महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या सोलापूर येथील डब्ल्यू.आय.टी. जैन टेम्पल येथे यंदाचे श्री जिनधर्म संस्कार शिबिर उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात सुरू आहे. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज शिबिराला भेट देत मुनिश्री १०८ वीरसागर जी महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणारे हे शिबिर ८ ते २५ वर्षे वयोगटातील जैन मुला-मुलींसाठी अध्यात्मिक संस्काराची अनमोल शिदोरी ठरत आहे. मुनिश्री १०८ वीरसागर जी महाराज व समस्त मुनि संघ यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरात जैन धर्माच्या तत्त्वज्ञानाची सखोल ओळख करून दिली जात आहे. गुरुवर्यांच्या उपस्थितीत शिबिरार्थींना सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच आचरणात्मक धर्मशिक्षणाचा अनुभव मिळत आहे.
शिबिराची सुरुवात शांत, साधनामय वातावरणात होत असून पूजा, अष्टद्रव्य विधी, नमोकार मंत्र, पाच पाप, लोकाकाश आणि आलोकाकाश यांसारख्या जैन तत्त्वज्ञानातील गूढ संकल्पनांचे सुलभ मार्गदर्शन केले जात आहे. विद्यार्थ्यांना आकर्षक चित्रांसह सुसज्ज ‘थ्री लोक एक्सप्लोरर’ स्वरूपातील अभ्यास पुस्तिका देण्यात आल्यामुळे त्यांच्या जिज्ञासेला चालना मिळत आहे. तसेच अभिषेक विधी, देवदर्शनाची शास्त्रशुद्ध पद्धत आणि स्तुती पठण यांचे मार्गदर्शन करत श्रद्धेला विवेकाची जोड देण्याचा संदेश दिला जात आहे.
या कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत दक्षिण सोलापूरचे आमदार दिलीप माने, सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल, भाजपा सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्यासह सोलापूर शहरातील पदाधिकारी, मान्यवर आणि जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.ML/ML/MS