ठाण्यातील ‘मामलेदार मिसळ’ची वास्तू जमिनदोस्त
ठाणे, दि. २५ : ठाणेकरांच्या खांद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली मामलेदार कचेरीच्या आवारात मिळणारी मामलेदार मिसळ अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. अनेक दशकांच्या आठवणी मिरवणारी ही वास्तू आता जमिनदोस्त होणार आहे. तहसील कार्यालयाच्या पुनर्विकासामुळे हे प्रसिद्ध ठिकाण पाडण्यात आले असून ठाण्याच्या खाद्यसंस्कृतीमधील एक सुंदर आठवण आता इतिहासजमा झाली आहे. १९५० च्या दशकात सुरू झालेल्या या छोट्याशा हॉटेलचा प्रवास थक्क करणारा आहे. सरकारी कामासाठी तहसील कार्यालयात येणारे अधिकारी आणि मामलेदार यांच्या हक्काचे खाण्याचे ठिकाण म्हणून या दुकानाची ओळख निर्माण झाली आणि तिथूनच याला ‘मामलेदार’ हे नाव पडले.
अत्यंत साधी बैठक व्यवस्था आणि झणझणीत चवीचा ‘कट’ हीच या ब्रँडची खरी ओळख होती. आता नवी इमारत उभी राहणार असली, तरी जुन्या वास्तूने दिलेली ती आपुलकीची चव ठाणेकर नक्कीच आठवणीत राहील . दरम्यान, या पाडलेल्या वास्तूचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर मामलेदारच्या ग्राहकांनी भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत. इथे बसून मिसळवर ताव मारण्याची मज्जाच वेगळी होती. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी असं अनेकांनी म्हटलं आहे.
SL/ML/SL