“आपली बस, आपली सेवा” १ मे पासून एसटीचे नवे अभियान..

 “आपली बस, आपली सेवा” १ मे पासून एसटीचे नवे अभियान..

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला सज्ज होत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने “आपली बस आपली सेवा” या व्यापक अभियानाच्या माध्यमातून प्रवासी सेवेला एक नवी दिशा देण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यानुसार एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सविस्तर परिपत्रक जारी केले आहे.

मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटी बसेसची संख्या वाढत असली, तरी प्रवासीसंख्या आणि महसूल अपेक्षेप्रमाणे वाढत नसल्याची जाणीव महामंडळाने गांभीर्याने घेतली आहे. याच जाणिवेतून प्रवाशांचा विश्वास पुन्हा दृढ करण्यासाठी आणि सेवेला मानवी स्पर्श देण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे.

सेवेतून संस्कार, शिस्तीतून विश्वास

या अभियानांतर्गत चालक आणि वाहक हे केवळ कर्मचारी न राहता ‘सेवक’ बनणार आहेत. बस ताफ्यात समाविष्ट करण्यापूर्वी तिची स्वच्छता, वेळेआधी फलाटावर उपस्थिती, नीटनेटका गणवेश आणि शिस्तबद्ध वर्तन यांना आता केवळ नियमांची चौकट नसून, सेवाभावाची ओळख मानली जाणार आहे.

बस सुटण्यापूर्वी चालकाने स्वतःची ओळख करून देत प्रवाशांना प्रवासाचा मार्ग, थांबे आणि अपेक्षित वेळ याची माहिती देणे—हा केवळ औपचारिक भाग नसून, प्रवाशांशी नातं जोडण्याचा एक सुसंवादी प्रयत्न असेल. प्रवासादरम्यान मदतीचा हात पुढे करणारा चालक-वाहक हा एसटीचा खरा चेहरा ठरेल.

प्रवासीही सेवेचे सहप्रवासी

या अभियानात प्रवाशांनाही समान सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे. स्वच्छता राखणे, मौल्यवान वस्तूंची जबाबदारी स्वतः घेणे, तसेच मोठे सामान योग्य ठिकाणी ठेवणे—या साध्या सवयी प्रवास अधिक सुखकर बनवतील. तसेच एनसीएमसी स्मार्ट कार्डचा वापर आणि ऑनलाइन आरक्षणाचा स्वीकार ही आधुनिकतेकडे टाकलेली पावले ठरतील.

अडचणीतही आधार, सेवेतही सातत्य

बस रद्द होणे किंवा मार्गात अडथळे निर्माण होणे या अनपेक्षित परिस्थितींमध्ये प्रवाशांना तत्काळ पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. बसस्थानके आणि परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज ठेवण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे.

तक्रारींवर तत्पर उपाय

प्रवाशांच्या तक्रारींना केवळ नोंद न मानता, त्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे. प्रत्येक स्तरावर नियमित आढावा घेत, सेवेतील उणिवा दूर करण्यावर भर दिला जाणार आहे.

नव्या विश्वासाचा प्रवास

१ मे २०२६ पासून राज्यभर राबविण्यात येणारे हे अभियान केवळ सेवा सुधारण्याचा उपक्रम नसून, एसटी आणि प्रवासी यांच्यातील विश्वासाचा नवा सेतू ठरणार आहे. लालपरीच्या चाकांना आता केवळ वेग नाही, तर संवेदनशीलतेचीही दिशा मिळणार आहे. “आपली बस, आपली सेवा” हा मंत्र प्रत्यक्षात उतरला, तर प्रत्येक प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग न राहता—एक सुखद, सन्मानपूर्वक आणि समाधानकारक अनुभव ठरेल. असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *