KYC प्रक्रिया सुलभ करण्यासाठी SEBI कडून आठ महत्त्वाचे बदल
मुंबई, दि. २७ : बाजार नियामक सेबीने (SEBI) केवायसी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आठ मोठे बदल केले आहेत. हे नवीन नियम २४ डिसेंबर २०२६ पासून लागू होतील. या बदलांचा उद्देश गुंतवणूकदारांना वारंवार कागदपत्रे सादर करण्याच्या त्रासापासून वाचवणे, केवायसी माहिती विविध संस्थांमध्ये सहज वापरता येण्याजोगी बनवणे आणि गुंतवणूकदारांच्या नोंदींचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करणे हा आहे.
वारंवारच्या माहितीत घट
गुंतवणूकदारांना प्रत्येक वेळी नवीन खाते उघडताना त्यांचे उत्पन्न, व्यवसाय, पीईपी (PEP) स्थिती आणि फॅटका/सीआरएस (FATCA/CRS) संबंधित माहिती पुन्हा भरण्याची शक्यता कमी होईल. खाते उघडणाऱ्या संस्थेला तीन कामकाजाच्या दिवसांच्या आत केआरएकडे आवश्यक केवायसी माहिती अपलोड करणे आवश्यक असेल.
केवायसी नोंदी आपोआप अद्ययावत
जेव्हा तुम्ही नवीन ब्रोकर किंवा म्युच्युअल फंडात खाते उघडता, तेव्हा ते केआरए आणि केंद्रीय केवायसी नोंदींमधून तुमची अद्ययावत माहिती घेऊन त्यांच्या नोंदी अद्ययावत करू शकतील. मात्र आवश्यक असल्यास अतिरिक्त माहिती मागवली जाऊ शकते.
मोबाइल नंबरची पडताळणीची आवश्यकता नाही.
तुमचा मोबाइल नंबर केआरए (KRA) नोंदींमध्ये आधीच सत्यापित आणि आधारशी जोडलेला असेल, तर नवीन खाते उघडताना पुन्हा पडताळणी करण्याची आवश्यकता भासणार नाही. ही प्रक्रिया ऐच्छिक असेल.
खाते बंद केल्यावर केवायसीची देवाणघेवाण
तुम्ही ब्रोकरकडील खाते बंद केले, तर त्यांना पाच कामकाजाच्या दिवसांच्या आत केआरएला कळवणे आवश्यक असेल. केआरए दोन कामकाजाच्या दिवसांच्या आत नोंदी अद्ययावत करेल किंवा काढून टाकेल. सहा महिन्यांपर्यंत म्युच्युअल फंडात कोणतीही गुंतवणूक किंवा होल्डिंग नसली तरीही केवायसी माहितीची देवाणघेवाण थांबवली जाऊ शकते.
खाते उघडले नाही, तर नोंदी हटवल्या जातील.
एखाद्या संस्थेने तुमचा केवायसी डेटा डाउनलोड केला, मात्र २१ कामकाजाच्या दिवसांत खाते उघडले नाही, तर त्यांनी केआरएला कळवणे आवश्यक आहे. त्यानंतर केआरए तुमची नोंद त्या संस्थेपासून वेगळी करेल.
नाव बदलण्यासाठी लागणारी कागदपत्रे सोपी
तुमचे नवीन नाव पॅन आणि आधारमध्ये अद्ययावत केले असेल, तर तुम्हाला नाव बदलाचा वेगळा पुरावा देण्याची गरज भासणार नाही. इतर प्रकरणांमध्ये विवाह प्रमाणपत्र, पासपोर्ट किंवा राजपत्र अधिसूचना यांसारख्या कागदपत्रांची आवश्यकता असू शकते.
परदेशी गुंतवणूकदारांना दिलासा
ओसीआय कार्डधारक आणि भारतीय आयकर कायद्यानुसार रहिवासी असलेल्या काही परदेशी नागरिकांना त्यांच्या परदेशी पत्त्याचा पुरावा देण्याची आवश्यकता भासणार नाही. मात्र, त्यांना त्यांच्या भारतीय पत्त्याचा सत्यापित पुरावा देणे आवश्यक असेल.
SL/ML/SL