2025-26 मध्ये देशात 3785.38 लाख टन अन्नधान्य उत्पादन
नवी दिल्ली, दि. २७ : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 2025-26 या वर्षातील प्रमुख कृषी पिकांचे अंतिम उत्पादन अंदाज आणि 2026-27 च्या खरीप हंगामातील पहिले आगाऊ उत्पादन अंदाज जाहीर केले. यावेळी त्यांनी भारताच्या कृषी क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरीची माहिती दिली. नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या धोरणांचे आणि उपक्रमांचे पाठबळ आणि शेतकऱ्यांचे कठोर परिश्रम यांमुळे भारताला तांदूळ, कडधान्ये, ताग, भरड धान्ये आणि मसाल्यांच्या उत्पादनात जागतिक स्तरावर अव्वल स्थान मिळवता आले आहे, असे त्यांनी सांगितले . देशाने 2025-26 मध्ये 3785.38 लाख टन इतके विक्रमी अन्नधान्य उत्पादन घेतले आहे. हा आतापर्यंतचा सर्वोच्च आकडा आहे. याशिवाय, एल निनो आणि मौसमी पावसाचे विलंबाने आगमन, अपुरी पर्जन्यवृष्टी यांसारख्या हवामानविषयक गंभीर आव्हानांनंतरही, 2026-27 मध्ये खरीप हंगामातील अन्नधान्य उत्पादन 1671.43 लाख मेट्रिक टन होण्याचा अंदाज आहे. हे उत्पादन गेल्या पाच वर्षांच्या सरासरी उत्पादनापेक्षा 97.67 लाख टनांनी अधिक आहे. यातून देशातील शेतकऱ्यांची प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता आणि दृढनिश्चय दिसून येतो, असे ते म्हणाले.
भारत केवळ देशांतर्गत अन्नधान्याची गरज पूर्ण करत नाही, तर जगाची भूक भागवण्यातही महत्त्वाचे योगदान देत आहे. जागतिक कृषी क्रमवारीत तांदूळ, कडधान्ये, ताग, भरड धान्ये आणि मसाल्यांच्या उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. तर गहू, कापूस, भुईमूग, फळे आणि भाजीपाला उत्पादनात चीननंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऊस उत्पादनातही ब्राझीलनंतर भारताचा दुसरा क्रमांक आहे. देशाच्या या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करताना चौहान म्हणाले की, भारताकडे तांदूळ आणि गहू या दोन्ही पिकांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. भारतीय तांदळाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, त्याच्या निर्यातीत 5 टक्क्यांची वाढ झाली आहे.
तांदूळ आणि गव्हाच्या उत्पादनात देशाने अतिरिक्त उत्पादनाची स्थिती गाठल्यानंतर, आता सरकारने पीक विविधतेला प्रोत्साहन देण्यावर आणि कडधान्ये व तेलबियांच्या उत्पादनात देशाला आत्मनिर्भर बनवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, असे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जाहीर केलेल्या 2025-26 या वर्षाच्या अंतिम अंदाजानुसार, देशाचे एकूण अन्नधान्य उत्पादन विक्रमी 3785.38 लाख टनांवर पोहोचले आहे. 2024-25 मध्ये नोंदवलेल्या 3577.32 लाख टन उत्पादनाच्या तुलनेत यंदा 208.06 लाख टनांची वाढ झाली आहे. देशाच्या अन्नधान्य उत्पादनात झालेली ही वाढ लक्षणीय असून विविध पीक उत्पादक प्रदेशांतील शेतकऱ्यांच्या योगदानाचे प्रतिबिंबित आहे.
तांदूळ आणि गहू : तांदळाचे एकूण उत्पादन 2024-25 मधील 1501.84 लाख टनांवरून 49.70 लाख टनांनी वाढून, 2025-26 मध्ये विक्रमी 1551.54 लाख टनांपर्यंत पोहोचले आहे. गव्हाचे उत्पादनही 1220.64 लाख टनांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचले असून, 2024-25 मध्ये उत्पादित झालेल्या 1179.45 लाख टनांच्या तुलनेत यावर्षी 41.19 लाख टनांची वाढ नोंदवली गेली आहे. ही आकडेवारी भारताच्या दोन प्रमुख अन्नधान्य पिकांची सातत्यपूर्ण उत्पादन आणि उच्च उत्पादन पातळी कायम राखण्याची देशाची क्षमता अधोरेखित करते.
पोषक तृणधान्ये आणि भरडधान्यांचे एकूण उत्पादन 740.80 लाख टन होते, त्यापैकी 172.09 लाख टन वाटा ‘श्री अन्ना’चा होता. कडधान्यांचे एकूण उत्पादन 2024-25 मधील 256.83 लाख टनांवरून 15.57 लाख टनांनी वाढून यावर्षी 272.40 लाख टनांवर पोहोचले.
तेलबिया आणि व्यापारी पिके: तेलबियांच्या एकूण उत्पादनातही वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या 429.89 लाख टनांच्या तुलनेत 2.66 लाख टनांची वाढ होऊन तेलबियांचे उत्पादन विक्रमी 432.55 लाख टनांवर पोहोचले.
SL/ML/SL