BMW ची इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात दाखल
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध मोटर कंपनी BMW ने भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर क्षेत्रात धमाकेदार एन्ट्री करत CE 04 ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व वेगवेगळ्या सुविधांनी सज्ज असलेल्या या स्कूटरची एक्स शोरूम किंमत १४.९० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. सध्या ही स्कूटर सिंगल व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. ती इम्पिरियल ब्लू आणि फिकट सफेद रंगात खरेदी करता येणार आहे. या स्कूटरचं बुकिंग सुरू झालं आहे.
BMW CE 04 ची वैशिष्ट्ये
- या स्कूटरमध्ये असलेली इलेक्ट्रिक मोटर ३१ किलोवॅटचं आउटपूट देते. ४१ बीएचपी पॉवर आणि ६१ एनएम टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर २.६ सेकंदात ० ते ५० किमी प्रति तास वेग पकडू शकते, असं कंपनीचं म्हणणं आहे.
- या स्कूटरचा जास्तीत जास्त वेग १२० किमी प्रति तास आहे. यात राइड मोड, १०.२५ इंच टीएफटी आणि ट्रॅक्शन कंट्रोलसह इतर अनेक इलेक्ट्रॉनिक्स सुविधा आहेत.
- स्कूटरमध्ये ८.५ केडब्ल्यूएच बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी सिंगल चार्जवर १३० किमीची रेंज देते. बॅटरी चार्ज होण्यास ४ तासांपेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. चार्जिंगचा वेळ जास्त वाटत असल्यास कंपनी ग्राहकांना काही किंमत आकारून फास्ट चार्जर ऑफर करते. या चार्जरचा वापर केल्यास बॅटरी १ तास ४० मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकते.
- CE 04 च्या बॉडी पॅनेलला स्टायलिश डिझाइन देण्यात आलं आहे. स्कूटरची सीट बेंचसारखी आहे. एक लहान विंडस्क्रीन किंवा चाके आणि ऑफसेट मोनोशॉक सारख्या डिझाइन घटकांचा समावेश आहे.
- स्कूटर १५ इंचाच्या चाकांवर चालते. गाडीच्या दोन्ही टोकाला २६५ मिमीचा डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.
ML/ML/SL
24 July 2024