मुंबईत शुक्रवारपासून १० टक्के पाणी कपात!

 मुंबईत शुक्रवारपासून १० टक्के पाणी कपात!

मुंबई प्रतिनिधी : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने शुक्रवार, १५ मे पासून शहरात १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या धरणात फक्त २३.५२ टक्केच पाणीसाठा कमी होत असलेला जलसाठा, वाढते तापमान, बाष्पीभवन तसेच पुढील मान्सूनबाबत भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अल निनो आणि आयओडीच्या पार्श्वभूमीवरील अंदाज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ११ मे रोजी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये एकूण ३ लाख ४० हजार ३९९ दशलक्ष लीटर इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून तो वार्षिक आवश्यक साठ्याच्या केवळ २३.५२ टक्के आहे. त्यामुळे उपलब्ध साठा अधिक काळ पुरावा यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पाणी कपात लागू करण्यात येत आहे. पालिकेने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करताना अतिरिक्त पाणीसाठ्याचीही माहिती दिली आहे. भातसा धरणातील निभावणी साठ्यातून १ लाख ४७ हजार ९२ दशलक्ष लीटर तर अप्पर वैतरणा धरणातून ९० हजार दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. तरीही पुढील काळात पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईसह ठाणे, भिवंडी-निजामपूर महापालिका आणि इतर गावांना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यातही १५ मेपासून १० टक्के कपात लागू राहणार आहे. जलाशयांमधील उपयुक्त साठ्यात समाधानकारक वाढ होईपर्यंत ही कपात कायम राहणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले.
………..
पाण्याचा अपव्यय टाळावा !
नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात, असे आवाहन पालिकेने केले आहे. शॉवरऐवजी बादलीने आंघोळ करणे, नळ सतत सुरू ठेवू नये, वाहन धुण्यासाठी पाइपचा वापर टाळणे, गळती तात्काळ दुरुस्त करणे, टाक्या ओव्हरफ्लो होऊ न देणे तसेच पाणी बचतीसाठी नोझलचा वापर करणे अशा उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हॉटेल्स, उपाहारगृहे तसेच व्यावसायिक आस्थापनांनीही पाण्याचा अपव्यय टाळून बचतीच्या उपाययोजना राबवाव्यात, असे पालिकेने म्हटले आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *