हक्कभंग प्रकरणी सुषमा अंधारे यांची विशेषाधिकार समितीसमोर साक्ष नोंद;अध्यक्ष प्रसाद लाड
मुंबई, दि ११: उबाठा गटाच्या नेत्या श्रीमती सुषमा अंधारे यांची आज विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीसमोर हक्कभंग प्रकरणी साक्ष नोंदविण्यात आली. ही चौकशी समितीच्या नियमांनुसार आणि पूर्ण पारदर्शकतेने पार पडली, असल्याचे समितीचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. संबंधित प्रकरणातील विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, पुढील प्रक्रिया समितीच्या नियमानुसार करण्यात येणार आहे.
यावेळी विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांच्यासह, आमदार प्रविण दरेकर आणि समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते. याआधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे श्रीमती अंधारे या सुनावणीस उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.
यासंदर्भात समितीचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड म्हणाले की, “यापूर्वी याच प्रकरणात कुणाल कामरा यांची साक्ष नोंदवण्यात आली होती. प्रवीण दरेकर यांच्या तक्रारीवरून श्रीमती सुषमा अंधारे यांचाही या प्रकरणात समावेश होता. त्यामुळे आज त्यांची साक्ष नोंदवून cross questioning करण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान समिती सदस्यांनी सुमारे २२ ते २३ प्रश्न विचारले. आमदार अनिल परब आणि आमदार मनीषा कायंदे यांनीही प्रश्न विचारले.”
ते पुढे म्हणाले, “काही प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, तर काही बाबींमध्ये गोलमोल उत्तरे देण्याचा प्रयत्न झाला. काही विषय न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर सार्वजनिक भाष्य करणे योग्य नाही. मात्र, हक्कभंग समितीसमोरील साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.”
समितीने श्रीमती अंधारे यांना त्यांचे म्हणणे अधिक स्पष्ट करण्यासाठी किंवा लेखी निवेदन सादर करण्याची संधी देखील दिली होती. मात्र त्यांनी यापुढे कोणतेही लेखी किंवा तोंडी स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले.
समितीचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले की, “या प्रकरणावर समितीच्या आगामी बैठकीत पुन्हा सविस्तर विचारविनिमय केला जाईल. न्यायिक, संवैधानिक आणि कायदेशीर पैलूंचा अभ्यास करून तज्ज्ञांचे लेखी मतही मागवले जाईल. त्यानंतर समिती अंतिम निर्णय घेईल.”
ते पुढे म्हणाले, “यापूर्वीच्या इतिहासात संबंधित व्यक्तीने आपली चूक मान्य करून दिलगिरी व्यक्त केल्यास समितीने सौम्य भूमिका घेतल्याची उदाहरणे आहेत. आजही श्रीमती अंधारे यांना तशी संधी देण्यात आली होती. मात्र त्यांनी दिलगिरी व्यक्त करण्यास नकार दिला. त्यांचा ठाम दावा होता की त्यांनी कोणत्याही व्यक्ती, विधान परिषद किंवा समितीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही, तर स्टुडिओमध्ये तोडफोड करणाऱ्यांविषयी भाष्य केले होते.”
विशेषाधिकार समिती या संपूर्ण प्रकरणाचा सर्वंकष विचार करून नियमानुसार पुढील निर्णय घेणार असल्याचे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.KK/ML/MS