बीडमध्ये मशिदीत स्फोट

बीड, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही महिन्यांपासून बीड शहर अनेक गंभीर घटनांमुळे सातत्याने चर्चेत राहीले आहे. त्यात आता अजून एका घटनेची भर पडली आहे. बीडमध्ये एका मशिदीत स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन माथेफिरुंनी वैयक्तिक भांडणातून जिलेटिनच्या काड्यांनी स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात मशिदीतील फरशी फुटली तसेच भिंतीला भेगा पडल्या. सुदैवाने कोणीतीही जीवितहानी झालेली नाही. मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील अर्धमसला गावातील मशिदीमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी सरकारकडे महत्त्वाची माहिती आहे. या प्रकरणातील आरोपी कोण आहेत, याचा लवकरच खुलासा केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बीडचे पोलीस अधीक्षक लवकरच यासंदर्भात संपूर्ण माहिती जाहीर करतील, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेबाबत बोलताना सांगितले की, सरकारकडे पुरावे आणि माहिती उपलब्ध असून चौकशीअंती संपूर्ण तथ्य जनतेसमोर आणले जाईल. या प्रकरणाची सखोल तपासणी करण्यात येत आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.