सौदी अरेबियात उष्णतेचा कहर, हज यात्रेसाठी गेलेल्या ५५० यात्रेकरूंचा उष्माघातामुळे मृत्यू

रियाध, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताबरोबरच जगभरात अनेक ठिकाणी उष्णतेचा कहर झाल्याचे दिसून येत आहे. सौदी अरेबियात तर तापमानाने 50 अंशांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे एकूणच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कडक उन्हामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हज यात्रेला गेलेल्या यात्रेकरूंनाही या भयानक उष्णतेचा प्रचंड त्रास होतो आहे. अति उष्णतेमुळे सुमारे ५५० हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचे मंगळवारी सौदी सरकारने सांगितले आहे. मृतांमध्ये ३२३ इजिप्तचे नागरिक होते, त्यापैकी बहुतेकांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला हजारो यात्रेकरू आजारी पडले आहेत. यात्रेकरूंचा उष्णाघाताने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याने सौदी अरेबिया सरकार वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडले आहे.
यंदा भारतातून १ लाख ७५ हजार यात्रेकरू हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला गेले आहेत. तर जगभरातील जवळपास १८ लाख भाविक हज यात्रेसाठी मक्का आणि मदिना येथे पोहोचले आहेत. सौदी सरकारने यात्रेकरूंसाठी योग्य व्यवस्था न केल्याने त्यांना उष्णतेसोबतच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा दावा मक्का आणि मदिना येथे जाणारे लोक करत आहेत.
उष्माघाताच्या २७०० हून अधिक प्रकरणांची नोंद झाल्याचे सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे . हज यात्रेदरम्यान उष्माघाताने मृत्यू झालेल्या यात्रेकरूंचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात अनेक मृतदेह रस्त्याच्या दुभाजकावर आणि फूटपाथवर ठेवलेले दिसत आहेत. यावरून नेटकरी सौदी अरेबियावर टीका करत आहेत.