भांडुपमध्ये बदलापुरसारखी घटना, लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून शाळेतील 3 मुलींचा विनयभंग
भांडुपमधील एका नामांकित शाळेत पुन्हा एकदा बदलापूरसारखीच घटना समोर आली आहे. लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून शाळेतील तीन मुलींचा विनयभंग केल्याची घटना २७ नोव्हेंबरला सकाळी घडली आहे. या शाळेत योगासने शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थिनीसोबत हा संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. विद्यार्थिनीनी हा प्रकार घरी सांगितल्याने ही घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. शाळेच्या बेसमेंटमध्ये १० व ११ वर्षीय तीन मुली योगासने करत होत्या. दरम्यान शाळेतील लिफ्टची सफाई आणि देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून या चिमुकलींची छेडछाड करण्यात आली. या प्रकाराची तक्रार मुलींनी योगा शिक्षिकेसह पालकांकडे केली. बेसमेंटमध्ये असलेले सीसीटीव्ही तपासले असता हा प्रकार उघडकीस आला. लिफ्ट ग्राऊंड फ्लोवरवर संपते. मात्र लिफ्टची सफाई आणि देखभाल करणाऱ्या कर्मचारी बेसमेंटमध्ये पडद्याच्यामागे लपल्याचे आढळून आला.