Twitter ने अचानक बदलला आपला लोगो
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ट्विटरचा ताबा घेतल्यापासून मालक एलॉन मस्क दरवेळीच काही ना काही धडाकेबाज निर्णय घेत चर्चेत राहीले आहेत. त्यांनी आता ट्विटरचा सुप्रसिद्ध असा निळ्या चिमणीचा लोगो बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. श्वानाचा लोगो ट्विटरसाठी वापरण्यात आला आहे. हा तडकाफडकी बदल पाहून वापरकर्ते त्रस्त झाले आहेत. यावर ट्विटरवर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत.
ट्विटरच्या लोगोत बदल झाल्यानंतर अनेकांना आधी ट्विटर हॅक झाले की काय असं वाटलं. मात्र, नंतर स्वतः एलॉन मस्क यांनीच ट्विट करत माहिती दिल्याने हा संभ्रम संपला आणि ट्विटरचा लोगो बदलण्यात आल्यावर शिक्कामोर्तब झालं.
या निर्णयानंतर एलॉन मस्क यांनी एक मीम शेअर केलं. यात श्वान कारच्या चालकाच्या जागेवर बसलेलं आहे आणि ते वाहतूक पोलिसांना आपलं ओळखपत्र दाखवत आहे. या ओळखपत्रात निळ्या चिमणीचा फोटो आहे. त्यावर हे श्वान वाहतूक पोलिसांना हा आपला जुना फोटो असल्याचं सांगत आहे.
एलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता जेथे जेथे निळी चिमणी दिसत होती तिथं तिथं श्वानाचा लोगो दिसत आहे. ट्विटर पेज रिफ्रेश केल्यानंतरही सुरुवातीला हाच श्वानाचा लोगो दिसतो आणि मग होम पेज ओपन होते. ट्विटरच्या साईटवर डावीकडे सर्वात वरच्या बाजूला हा निळ्या चिमणीच्या जागी श्वानाचा लोगो दिसत आहे.
ट्विटर विकत घेतल्यानंतर मस्क यांनी ब्ल्यू टिक शुल्क (blue tick charges), कर्मचारी कपात, सीईओ पराग अग्रवाल (ceo parag agrawal) यांची हकालपट्टी असे अनेक निर्णय घेतले. त्याच क्रमवारीत ट्विटरचा लोगो बदल देखील येत आहे. लोगो बदलल्यानंतर मस्क यांनी एका युजरला ट्विटमध्ये सांगितले की, ‘मी ते वचन दिले होते ते पूर्ण केले.’
SL/KA/SL
4 April 2023