विभागलेल्या राष्ट्रवादीचा फैसला जनताच करेल
पुणे, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनता आणि कार्यकर्त्यांच्या बळावर आजवर निवडणुका लढला आहे, ज्या जागा मिळाल्या त्याही जनतेनं दिल्या आहेत, त्यामुळे यावेळीही २ भागात विभागलेल्या पक्षाबाबत जनताच न्याय करेल, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज बारामतीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निवडून आलेल्या प्रतिनिधींनी वेगळा घरोबा केला आहे. हा जनता किंवा कार्यकर्त्यांचा निर्णय नाही, तर सत्तेसाठी झालेली तडजोड आहे, असंही ते पुढे म्हणाले. सत्ता मिळवण्यासाठी पक्ष फोडण्याची भूमिका योग्य नव्हती, अशी अप्रत्यक्ष टीकाही त्यांनी अजित पवार यांच्यावर केली.
पक्षातल्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक चिकाटीनं लढली, तर यश नक्की मिळेल, मात्र अतिविश्वासाने लढू नका. यश केवळ मिळवायचं नाही, तर दाखवायचं आहे. एकापासून शंभरापर्यंत पोहोचायचं आहे, त्यामुळे पुढच्या काही दिवसाचा एक तासही वाया न घालवता, कामाला लागा, असे आदेश शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.