मत विभाजन टाळण्यासाठी मुस्लिम , मराठा आणि बौद्धांची एकी
जालना दि ३१– मुस्लिम, मराठा आणि बौध्द यांचे एकीकरण करत असल्याची घोषणा मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज केली. हे तिन्ही समाज एकत्र येऊन निवडणुका लढवण्यावर आजच्या बैठकीत सहमती झाल्याचेही त्यांनी सांगितले.
मुस्लीम धर्मगुरु आणि वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी आणि राजरत्न आंबेडकर यांनी आज आंतरवाली सराटी इथं जरांगे यांची भेट घेतली. या बैठकीला बौध्द धर्मगुरुही उपस्थित होते.
निवडणुकीत मतविभाजन टाळण्यासाठी तसेच या तिन्ही समाजांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी एकत्र लढा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं जरांगे यांनी यावेळी सांगितलं. सर्व ठिकाणी या तिन्ही समाजाच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. आता कोणते मतदारसंघ आणि उमेदवार कोणाच्या वाटयाला येतील, यावर चर्चा करुन ३ नोव्हेंबरपर्यंत आमचे उमेदवार आम्ही घोषित करणार, असे जरांगे यांनी सांगितले. आम्ही धर्म परिवर्तन नाही, तर सत्ता परिवर्तन करण्यासाठी एकत्र आलो आहोत असेही ते म्हणाले.