डेंगी, हिवताप प्रतिबंधासाठी पालिका विशेष लक्ष केंद्रीत पद्धती अवलंबणार

 डेंगी, हिवताप प्रतिबंधासाठी पालिका विशेष लक्ष केंद्रीत पद्धती अवलंबणार

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत डेंगी आणि हिवताप तसेच इतर जलजन्य आजार प्रतिबंधासाठी विविध स्तरांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. यासोबत यंदाच्या पावसाळ्यात विशेष लक्ष केंद्रीत अर्थात ‘फोकाय’ (Foci) पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. मुंबईतील डेंगी आणि हिवताप रूग्ण सर्वाधिक संख्येने आढळल्यास त्या विशिष्ट विभागांमध्ये ही पद्धती राबविण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रामार्फतही हे धोरण अवलंबण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे.

मुंबईत हिवताप (मलेरिया) आणि डेंगी रूग्णांच्या गत काही वर्षांच्या आकडेवारीचा अभ्यास करून यंदा प्रभावीपणे उपाययोजना करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्यासह अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार विभागनिहाय डास सर्वेक्षण आणि डासांची उत्पत्ती स्थाने शोधण्यासाठीची मोहीम राबविणे, यासह प्रशिक्षण आणि जनजागृती मोहीम राबवण्याची कार्यवाही कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) दक्षा शहा यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

पावसाळा पूर्वतयारी व उपाययोजना अंतर्गत १६ एप्रिल २०२४ रोजी कीटकनाशक विभागाकडून महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली डास निर्मूलन समिती
(Moquito Abatement Committee) ची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस मुंबई महानगरातील शासकीय, निमशासकीय, लष्कर, नौदल इत्यादी २२ विविध संस्थाचे प्रतिनिधी हजर होते. सर्व संस्थाना त्यांच्या अखत्यारितील इमारतीतील पाण्याच्या टाक्या, पाणी गळतीची आणि साचण्याची ठिकाणे, अडगळीचे सामान इत्यादीबाबत ज्या ठिकाणी पाणी साचून डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी डास प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

विभागनिहाय सहायक आयुक्त आढावा सभा-

मार्च ते जून अखेरपर्यंत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली परिमंडळ सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कीटकनियंत्रण अधिकारी यांची हिवताप, डेंगी व इतर जलजन्य आजारांसाठी पावसाळापूर्व तयारीसाठी दोन वेळा आढावा सभा झाली. या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार सर्व विभागांमध्ये व विशेषतः डेंगी आणि हिवतापसंक्रमित अतिजोखमीच्या विभागांमध्ये त्यांच्या हद्दीतील डास उत्पत्तीची ठिकाणे हाती घेऊन नष्ट करण्याची विशेष मोहीम सुरु झाली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभाग, परिरक्षण विभाग, इमारत विभाग, आरोग्य विभाग यांनी परस्पर समन्वय साधून कार्य करावे, असे निर्देशही यावेळी दिले होते.

फोकाय पद्धतीची अंमलबजावणी –
जागतिक आरोग्य संघटना, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (दिल्ली) व बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने नुकत्याच पार पडलेल्या कार्यशाळेत हिवताप, डेंगी आणि जलजन्य आजार यांचे प्रतिबंधक नियंत्रण व उपाययोजना याबाबत विशेष लक्ष केंद्रीत अर्थात ‘फोकाय’ आधारित उपचार आणि सूक्ष्म आराखडा याबाबत विशेष भर देण्यात आला आहे. ज्याठिकाणी एखाद्या आजाराचे सर्वाधिक रूग्ण आहेत, अशा ठिकाणी लक्ष केंद्रीत करतानाच अधिकाधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना त्या विशिष्ट विभागात राबविण्याचे उद्दिष्ट या पद्धतीनुसार ठेवण्यात येते. डासांची उत्पत्तीस्थाने शोधणे, डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करणे अशा उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येतात. तसेच डेंगी आणि हिवताप रूग्णांची संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन करणे अपेक्षित आहे. यंदाच्या पावसाळ्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करतानाच आक्रमकपणे हा आराखडा राबवण्यात येणार आहे. एखाद्या भागात सर्वेक्षण करताना डासांच्या उत्पत्तीचा उगम शोधणे, सर्वेक्षण करणे, डेंगी आणि हिवतापाचे रूग्ण शोधणे आणि रूग्णांवर उपचार करणे यासारख्या उपाययोजना यामध्ये केल्या जातील, जेणेकरून या आजारांवर पूर्णतः नियंत्रण ठेवता येईल.

पावसाळी आजारांची वर्ष २०२१ ते वर्ष २०२४ या चार वर्षांची जानेवारी ते मे या पाच महिने कालावधीतील तुलनात्मक रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे –

१) हिवताप –
२०२१ – १४०१
२०२२ – ८९३
२०२३ – ११९०
२०२४ – १६१२

२) डेंगी
२०२१ – ३७
२०२२ – ८४
२०२३ – ३५६
२०२४ – ३३८

३) चिकुनगुनिया
२०२१ – ०
२०२२ – ४
२०२३ – ६१
२०२४ – २१

४) गॅस्ट्रो
२०२१ – १०९८
२०२२ – २३६३
२०२३ – ६१७७
२०२४ – ३४७८

५) हेपटायटिस
२०२१ – ६४
२०२२ – १८८
२०२३ – २५४
२०२४ – २४८

या आकडेवारीबाबत प्रकर्षाने नमूद करण्यात येते की, सन २०२१ आणि २०२२ च्या तुलनेत सन २०२३ मध्ये रूग्णसंख्येत लक्षणीय वाढ आढळून येण्याचे प्रमुख कारण म्हणजे सन २०२३ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने रूग्णसंख्या नोंद घेण्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढवली. पूर्वीच्या २२ वरून थेट ८८० वैद्यकीय संस्थांकडून या आजारांच्या रूग्णसंख्येची नोंद होऊ लागली. यामध्ये रूग्णालये, दवाखाने आणि वैद्यकीय प्रयोगशाळांचादेखील समावेश आहे. थोडक्यात रूग्णसंख्येची नोंद अधिक चांगल्या रितीने होत असल्याने २०२३ मध्ये आकडे वाढल्याचे आढळतात.

प्रशिक्षण –
यंदा जागतिक हिवताप निर्मूलन दिनानिमित्त मुंबई सेंट्रल स्थित नायर दंत रुग्णालय येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र्र आरोग्य विद्यापिठाचे संशोधन विभाग आयोजित प्रशिक्षण परिसंवादात साधारण ८५ भारतीय वैद्यकीय संघटना पदाधिकारी, खासगी डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
हिवताप, डेंगी आणि जलजन्य आजार यांचे प्रतिबंधात्मक नियंत्रण व उपाययोजना याबाबत केईएम रुग्णालयात १८ तुकड्यांमध्ये अद्ययावत प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षणाला वैद्यकीय रुग्णालये, सर्वसाधारण रुग्णालये व दवाखाने असे सर्व मिळून एकूण ४८२ वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी हजर होते.

त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तिन्ही विभागांमध्ये खासगी वैद्यकीय संस्थांमध्येदेखील प्रशिक्षण आयोजित करून क्षमता बांधणी (capacity building) वर जोर देण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे आरोग्य केंद्रातील कर्मचाऱयांचा विचार करता जून महिन्यात साधारण पाच हजार कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स, खासगी डॉक्टर्स व आयुष डॉक्टर्स यांचेकरिता विभागनिहाय प्रशिक्षण-
हिवताप नियंत्रण विषयक मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करणे तसेच हिवताप रूग्णांवर समूळ उपचार करणे या अनुषंगाने जून २०२४ या महिन्यात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) डॉक्टर्स यांचे शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरे विभागनिहाय प्रशिक्षण त्याचप्रमाणे खासगी डॉक्टर्स व आयुष डॉक्टर्स यांचे विभागनिहाय प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. दिनांक ११ जून २०२४ पर्यंत १,९५० खासगी डॉक्टर्स यांचे विशेष प्रशिक्षण संपन्न झाले आहे.

बांधकामांच्या ठिकाणी प्रशिक्षण-
मुंबईत पुनर्विकास प्रकल्प अंतर्गत विविध बांधकामांच्या ठिकाणी डास उत्पत्ती स्थाने नष्ट करणे व डासांची उत्पत्ती होऊ न देणे यावरदेखील लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा अधिकारी यांचे प्रशिक्षण सत्र घेण्यात येत आहेत. मे २०२४ अखेरपर्यंतचा विचार करता आतापर्यंत साधारणपणे २ हजार ६७० सुरक्षा अधिकारी तसेच त्यांचे सहकारी यांचे प्रशिक्षण पार पडले आहे.

वैद्यकीय महाविद्यालयातील पीएसएम (Community Medicine) विभागातील विभागप्रमुख यांचा सहभाग-
वस्तीपातळीवर योग्यप्रकारे सर्वेक्षण करणे, कीटकनियंत्रण करणे, सहकारी गृहनिर्माण संस्थांतील नागरिकांचा सहभाग व वैद्यकीय महाविद्यालयातील तरूणांची मदत घेऊन हिवतापावर समूळ उपचार, डेंगी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता वैद्यकीय महाविद्यालयातील पीएसएम (Community Medicine) विभागातील विभागप्रमुख व त्यांचे सहयोगी अध्यापक यांचा सहभाग घेण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार सदर विभागप्रमुख आणि त्यांचे पथक विभागनिहाय भेटी देऊन हिवताप, डेंगी नियंत्रण कार्य करीत आहेत.

डेंगी व हिवताप प्रतिबंधक उपाययोजना-
कीटकनाशक विभागामार्फत आतापर्यंत चार वेळा विभागनिहाय ‘एडिस’ डास सर्वेक्षण पार पडले आहे. त्यामध्ये ४४ हजार १२८ ठिकाणी डासांची उत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट करण्यात आली आहेत. ज्या परिसरात लोक उघड्यावर झोपतात, अशा ठिकाणी ओडोमॉस क्रिम, मच्छरदाणी आदी गोष्टींचा वापर करण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना करण्यात येणार आहेत.

जनजागृती मोहीम –
वस्तीपातळीवर झोपडपट्टी विभागात गृहनिर्माण संस्था व चाळींमध्ये इत्यादी ठिकाणी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. भित्तीपत्रके, फलक, हस्तपत्रिका, माहितीपट चित्रफित इत्यादी सहाय्याने जनजागृती करुन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे.

The municipality will adopt special focused methods

ML/ML/PGB
11 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *