मुंबईकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी मुंबई मनपा सहकार चळवळीच्या पाठीशी उभी राहील – महापौर रितू तावडे

 मुंबईकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी मुंबई मनपा सहकार चळवळीच्या पाठीशी उभी राहील – महापौर रितू तावडे

मुंबई, दी २४- सामान्य माणसाची बँक मुंबई बँक आहे. बँका या आकड्याने बनत नाहीत त्या सामान्य माणसाच्या विश्वासातून घडत असतात असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील नूतनीकृत सभागृहाच्या उदघाटन प्रसंगी केले. तर महापौर रितू तावडे यांनी मुंबईकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी मुंबई मनपा सहकार चळवळीच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून उभी राहील, असा ठाम विश्वास व्यक्त केला.

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महापौर रितू तावडे, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, आमदार प्रमोद जठार, संचालक नंदकुमार काटकर, प्रकाश दरेकर, अनिल गजरे, विनोद बोरसे, विष्णू घुमरे, जिजाबा पवार, आनंदराव गोळे, पुरुषोत्तम दळवी, विठ्ठलराव भोसले, जयश्री पांचाळ, शिल्पा सरपोतदार, कविता देशमुख, तेजस्वी घोसाळकर, कार्यकारी संचालक संदीप सुर्वे, कर्मचारी प्रतिनिधी बंटी म्हशीलकर, भारत थोरात यांसह सहकार क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुंबई बँकेच्या कार्याचे कौतुक करताना म्हणाले कि, मुंबईत अनेक मोठमोठ्या बँका आहेत. परंतु जे मायक्रो फायनान्सिंग मुंबई बँक करते, ज्या प्रकारे सामान्य माणसाला फायनान्सचा ऍक्सेस देते ते कार्य फार कमी आर्थिक संस्था करताना दिसतात. तसेच वसंतदादा पाटील यांची ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून ओळख. पण सहकार चळवळीतील हाडामासाचा माणूस म्हणून महाराष्ट्रालाच नाही तर देशाला त्यांची ओळख आहे. सहकाराच्या माध्यमातून तळागाळातील माणसाच्या हातात पैसा पुरवायचा, त्यांना व्यवसायाची संधी द्यायची ही संकल्पना त्यांची होती. ती संकल्पना पूर्ततेस आणण्यासाठी मुंबई बँकेने अतोनात कष्ट केले आहेत. सामान्य माणसाची बँक मुंबई बँक आहे. बँका या आकड्याने बनत नाहीत त्या सामान्य माणसाच्या विश्वासातून घडत असल्याचेही नार्वेकर म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले कि, विधानसभेचा अध्यक्ष म्हणून काम करताना बँकिंग क्षेत्राला जास्तीत जास्त वाव व जास्तीत जास्त उपयोगाचे कायदे कसे बनतील याकडे लक्ष असते. आ. प्रवीण दरेकर यांनी नेहमीच सभागृहात बँकिंग सेक्टरवर भूमिका मांडली व सामान्य माणसाला न्याय द्यायचे काम केले. जी बँक बाराशे कोटीची उलाढाल करत होती ती दरेकरांच्या नेतृत्वात १६ हजार कोटींहून अधिक उलाढाल करताना पाहत आहोत. येणाऱ्या काळात त्यांचे हे कार्य असेच सुरु राहील व जनसामान्य माणसाला बॅकिंग फायनान्स उपलब्ध करून द्यायची संधी देतील. मुंबई बँक सरकारलाही योजना राबविण्यासाठी मोलाची साथ देत आली आहे. ही बँक राज्यातील सर्वोत्कृष्ट सहकार क्षेत्रातील बँक असेल याबद्धल कुणाच्याही मनात संदेह राहणार नाही, अशी भावनाही नार्वेकरांनी व्यक्त केली.

तर महापौर रितू तावडे यांनी मुंबई बँकेच्या सभागृहाला पद्मभूषण वसंतदादा पाटील यांचे नाव देणे हा केवळ नामकरण सोहळा नसून ती वैभवशाली विचारांना दिलेली मानवानंदना असल्याचे म्हटले. एका बाजूला कॉर्पोरेट सेक्टर तर दुसऱ्या बाजूला मुंबई बँक हा विरोधाभास नाही तर मुंबईकरांच्या एकजुटीने, सहकाराने अफाट असे सामर्थ्य उभे राहिलेय. मुंबई कधीही न थांबणारी नगरी आहे. मुंबईच्या इंजिनाला खऱ्या अर्थाने इंधन पुरवण्याचे काम येथील कामगारांनी, मध्यमवर्गीयांनी, सहकारी संस्थांनी केले. त्या सर्वांचा आर्थिक कणा म्हणून मुंबई बँक गेली अनेक दशके उभी आहे. स्पर्धेच्या युगात अनेक मोठ्या संस्था डळमळीत होत असताना मुंबई बँकेने हिरक महोत्सवी टप्पा ओलांडून यशाचा नवा विक्रम प्रस्थापित केलाय. जुन्या पिढीचा विश्वास जपताना मुंबई बँकेने तरुण पिढीची नसही अचूक ओळखलीय. बँक केवळ आकडे मोजणारी तिजोरी नसावी तिला माणुसकीचा ओलावा, सामाजिक जाण असावी हे मुंबई बँकेने कृतीतून सिद्ध केल्याचेही महापौर म्हणाल्या. यावेळी महापौरांनी मुंबई बँकेच्या स्वयं पुनर्विकास योजनेचेही कौतुक केले व मुंबईकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी, महिला सबलिकरणासाठी, सुरक्षित सुंदर-स्वच्छ मुंबई घडविण्यासाठी मुंबई महापालिका सहकार चळवळीच्या खांद्याला खांदा लावून पाठीशी उभी राहील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांनी पद्मभूषण वसंतदादा पाटील या सभागृहाच्या माध्यमातून शिक्षण प्रशिक्षणाचे काम, सहकारातील विविध कार्यक्रम होतील असे मुंबईतील सहकार चळवळीला, सहकार चळवळीतील नेत्यांना, कार्यकर्त्यांना आश्वस्त केले. तसेच आम्ही संचालक मंडळावर आलो त्यावेळी बाराशे कोटींची बँक होती. बाराशे कोटींचा टप्पा ओलांडून सोळा हजार कोटींवर व्यवहार करण्याचे काम व्यासपीठावर बसलेल्या संचालक मंडळाच्या सहकार्याने केला. अनेक संकटे आली परंतु न डगमगता मुंबईतील सहकारी कार्यकर्त्यांचा, संस्थांचा आमच्यावर विश्वास आहे ही शिदोरी घेऊन बँकेला नावलौकिक केले. बँकेच्या माध्यमातून बँकिंग तर केले, सहकारी संस्थांना आर्थिक पाठबळ देण्याचे कामही केले. परंतु सामाजिक बांधिलकीतून दायित्व सांभाळण्याची भूमिकाही पार पाडली. समाजातील मध्यम घटकाला मदत करण्याचे काम मुंबई बँकेने केले. लाडक्या बहिणींना उद्योगासाठी एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिले. आता नमो टॅक्सीसारखी संकल्पना घेऊन येत आहोत. पुढील आठवड्यात जवळपास शंभर टॅक्सी मुंबईत पहिल्या टप्प्यात आणतोय. यामध्ये महिलांचा सन्मान म्हणून एकूण येणाऱ्या ५० टक्के गाड्या महिलांना बिनव्याजी देणार असून आता मुंबईत महिला ड्रायव्हिंग करताना दिसणार आहेत. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून मदत व पाठबळ देणारी राज्यातील संस्था मुंबई बँक असल्याचेही आ. दरेकर यावेळी म्हणाले.

महिला सहकारी संस्था, मजूर संस्थांना पाठबळ द्यावे

महिला सहकारी संस्थांची संख्या जास्त असून त्यांची थकीत बिले बैठक घेऊन निकाली काढावी. मुंबई महापालिकेत कष्ट करणारी माणसं ज्या संस्था चालवतात त्यांना पाठबळ द्यावे. ५-१० कंत्राटदार मुंबई चालवणार असतील तर महिला सहकारी संस्था, बेरोजगार संस्था, मजूर सहकारी संस्थांनी कुठे जायचे, अशी विचारणा करत आ. प्रवीण दरेकर यांनी महापौर रितू तावडे यांना यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली. तसेच अर्बन बँका अडचणीत आहेत. सरकार म्हणून त्यांना पाठबळ देणे आवश्यक आहे. सरकारने कमिटी नेमली असून त्या कमिटीने दोनशे कोटीचे अर्बन बँकांना सहाय्य करण्यासाठी सांगितले आहे. तो प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आ. दरेकरांनी केली.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *