खासदार क्रीडा संग्राम २०२६ मध्ये श्री गणेश आखाड्याचे घवघवीत यश!
ठाणे दि २४ : डोंबिवली येथील संत सावळाराम क्रीडा संकुल येथे दिनांक २० ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ” खासदार क्रीडा संग्राम २०२६ ” चे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडासंग्रामांतर्गत दिनांक २० ते २२ नोव्हेंबर २०२६ दरम्यान कुस्ती स्पर्धा उत्साहात आणि दिमाखात पार पडली.
या स्पर्धेमध्ये मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील पैलवानांनी उल्लेखनीय कामगिरी करत आखाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. आपल्या आखाड्यातील दोन पैलवानांनी सुवर्णपदक, तर तीन पैलवानांनी कांस्यपदक पटकावत एकूण पाच पदकांची कमाई केली.
या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडणारे पैलवान विशाल जाधव यांनी ९२ किलो वजनी गटात अत्यंत प्रेक्षणीय व आक्रमक कुस्त्यांचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
तसेच आपल्या आखाड्यातील महिला कुस्तीपटू कु. कोमल पटेल हिने ५० किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावून महिला कुस्तीमध्ये आपली चमक दाखवली.
याशिवाय आपल्या आखाड्यातील अन्य कुस्तीपटूंनीही पदकांची कमाई करत यशात मोलाची भर घातली.
🥉 पदकविजेत्या पैलवानांची कामगिरी :
🥇 पैलवान विशाल जाधव – ९२ किलो वजनी गट – प्रथम क्रमांक (सुवर्णपदक)
🥇 कु. कोमल पटेल – ५० किलो वजनी गट – प्रथम क्रमांक (सुवर्णपदक)
🥉 पैलवान तनुजा मांढरे – ४६ किलो वजनी गट – कांस्यपदक
🥉 पैलवान शगुन गुप्ता – ६५ किलो वजनी गट – कांस्यपदक
🥉 पैलवान आदर्श शिंदे – ७९ किलो वजनी गट – कांस्यपदक
विशाल जाधव , कोमल पटेल , शगुन गुप्ता हे तिघेही भाईंदर येथील अभिनव कॉलेज चे विद्यार्थी आहेत तर तनुजा मांढरे ही भाईंदर सेकंडरी स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे.
ML/ML/MS