वसंतस्मृती पुरस्कारांतून १५९ शिक्षक-कर्मचाऱ्यांचा गौरव!
ठाणे दि २४ : शिक्षण क्षेत्रातील योगदानाची दखल घेत शिक्षक, शिक्षण संस्थाचालक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याबरोबरच संकटकाळात जीवाची पर्वा न करता बचावकार्य करणाऱ्या अग्निशमन जवानांचाही गौरव करण्यात आला. लोकनेते स्व. वसंतरावजी डावखरे यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त आयोजित नवव्या वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात कोकण विभागातील १२५ शिक्षक, नऊ शिक्षण संस्थाचालक आणि २५ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. दिवाळीत रहेजा गार्डन परिसरातील आगीच्या घटनांमध्ये तत्परतेने बचावकार्य करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून मंगळवारी ठाण्यात हा सोहळा पार पडला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार माधवी नाईक, नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ गावडे, भाजप शिक्षक प्रकोष्ठचे प्रदेश प्रभारी सुनील लोढा, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षक हा समाजाच्या जडणघडणीतील महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यात विचार, मूल्ये आणि व्यक्तिमत्त्व घडविण्याचे काम शिक्षक करतात. शिक्षण संस्थाचालक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे या सर्व घटकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी वसंतस्मृती पुरस्कार सोहळा आयोजित केला जात असल्याचे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.
दिवाळीच्या काळात रहेजा गार्डन परिसरात आगीच्या घटना घडल्या होत्या. या वेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने बचावकार्य करून जीवितहानी टाळण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
वसंतरावजींनी दाखविलेला विश्वास जपणार
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वसंतरावजी डावखरे यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांना उजाळा दिला. वसंतरावजींनी निरंजन डावखरे यांची जबाबदारी आपल्यावर विश्वासाने सोपविली होती. तेव्हापासून निरंजन यांच्या पाठीशी आपला पाठिंबा कायम असल्याचे सांगत वसंतरावजींनी दाखविलेला विश्वास आणि त्यांच्याशी असलेले नाते जपण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शिक्षकांचा सन्मान म्हणजे समाजाच्या जडणघडणीतील त्यांच्या योगदानाचा गौरव आहे. शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालकांशिवाय शैक्षणिक व्यवस्था पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे सर्व घटकांचा एकत्रित सन्मान करणारा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सुनील लोढा यांनी नमूद केले.
नऊ वर्षांत १,१२५ शिक्षकांचा सन्मान
वसंतस्मृती पुरस्कार सोहळ्याचे यंदा नववे वर्ष होते. आतापर्यंत या उपक्रमातून १,१२५ हून अधिक शिक्षक, ४० हून अधिक शिक्षण संस्थाचालक आणि ५० हून अधिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे. कोकण विभागातील पाचही जिल्ह्यांतून ऑनलाइन अर्ज मागवून निवड समितीमार्फत पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि मानपत्र देऊन पुरस्कारार्थींचा गौरव करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण कार्याची दखल घेणारा हा उपक्रम आता पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न राहता शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेतील विविध घटकांना प्रोत्साहन देणारा व्यासपीठ ठरत आहे.ML/ML/MS