गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी १३०० झाडांचा बळी
मुंबई, दि. 24 : गोरेगाव-मुलुंड लिंक रोड ( GMLR) प्रकल्पाच्या कामासाठी तब्बल १३०० झाडे बाधित होण्याची शक्यता आहे. या झाडांवर मुंबई मनपाच्या वतीने नोटिसा चिकटविण्यात आल्या आहेत. गोरेगाव आणि मुलुंड या दोन उपनगरांना जोडणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वाहतूककोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. मात्र, या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे बाधित होणार असल्याने पर्यावरणीय परिणामांचाही विचार होणे आवश्यक आहे. संबंधित झाडांवर नोटिसा लावून महापालिकेने पुढील प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गोरेगाव – ऐरोली टोलनाका, मुलुंड या प्रस्तावित जीएमएलआरच्या टप्पा-४ अंतर्गत पूर्व द्रुतगती महामार्ग आणि जीएमएलआर जंक्शनच्या सुधारणा कामासाठी १,३५२ झाडे तोडण्याचा, तर १३०० झाडांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतला असून विकासाच्या नावाखाली एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करू नये, अशी मागणी केली जात होती. वृक्षतोड आणि पुनर्रोपणासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या.
SL/ML/SL