करमुसे प्रकरणातील आरोपी अंगरक्षक वैभव कदम यांची आत्महत्या

पनवेल, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अनंत करमुसे प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू करण्यात आल्यानंतर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा माजी अंगरक्षक वैभव कदम याने आज आत्महत्या केली आहे.
१५ दिवसांपूर्वी त्याला चौकशीसाठी बोलविण्यात आले होते, ठाण्यातील अनंत करमुसे प्रकरणात आरोपी असलेले पोलीस शिपाई वैभव कदम याने बुधवारी सकाळी निळजे ते तळोजा रेल्वे मार्गदरम्यान ट्रेन समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
वैभव कदम हे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे मंत्री असतांना त्यांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत असतांना अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाणीत पोलीस शिपाई वैभव कदम यांच्यासह तीन पोलिसांना आरोपी करण्यात आले होते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार अनंत करमुसे प्रकरणाची पुन्हा चौकशी केली सुरू करण्यात आली होती आणि १५ दिवसांपूर्वी वैभव कदम यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते अशी माहिती सूत्रांनी दिली.
वैभव कदम हे तळोजा येथे राहण्यास होते, राज्य राखीव पोलीस दलात असणारे वैभव कदम हे विशेष सुरक्षा दलात प्रतिनियुक्तीवर होते. बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे पोलिसांना निळजे ते तळोजा रेल्वे मार्गाच्या दरम्यान मृतदेह आढळून आला, वैभव कदम यांनी दिवा वरून रोहा कडे जाणाऱ्या मेमो ट्रेनखाली आत्महत्या केल्याची माहिती ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली.
त्यांच्या मृतदेहाजवळ काहीही आक्षेपार्ह मिळालेले नसून त्यांच्या पत्नीचा जबाब नोंदवला जाणार आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी अनंत करमुसे प्रकरणानंतर ते खूप मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. ठाणे रेल्वे पोलिसानी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू असल्याचे कांदे यांनी सांगितले.Suicide of accused bodyguard Vaibhav Kadam in Karamuse case
दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्री असणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे वैभव कदम हे अंगरक्षक होते. त्याच वेळी अनंत करमुसे यांना आव्हाडांच्या बंगल्यात उचलून आणणाऱ्यामध्ये तीन पोलीस शिपाई होते त्यापैकी वैभव कदम हे एक होते. करमुसे प्रकरणात वैभव कदम यांच्या सह तीन पोलिसांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक देखील करण्यात आली होती. त्यानंतर जामिनावर बाहेर पडल्यानंतर काही काळ निलंबित असणारे वैभव कदम यांनी पुन्हा पोलीस दलात घेण्यात आले होते, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, गेल्या काही आठवड्यापासून अनंत करमुसे प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता, स्थानिक पातळीवर या प्रकरणाचा तपास होऊ द्या असे सांगण्यात आले होते.
या प्रकरणाचा पुन्हा एकदा तपास सुरू करण्यात आला होता , अनंत करमुसे प्रकरणात आरोपी करण्यात आल्यानंतर वैभव कदम हे मानसिक तणावात होतेच, परंतु पुन्हा हे प्रकरण उकरून काढल्यामुळे ते अधिकच तणावात गेले होते अशी माहिती समोर येत आहे.
ML/KA/PGB
29 Mar. 2023