समुद्रातील तरंगता कचरा काढण्यासाठी भारताचे प्रवेशद्वार आणि बधवार पार्क येथे इलेक्ट्रिक बोट कार्यरत
मुंबई, दि १८
समुद्र किनारा आणि लगतचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. याच अनुषंगाने, समुद्रातील तरंगता कचरा संकलित करण्यासाठी भारताचे प्रवेशद्वार (गेटवे ऑफ इंडिया) आणि बधवार पार्क परिसरात मानवरहित विद्युत नाव (इलेक्ट्रिक बोट) कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या नावेच्या माध्यमातून या परिसरातून रोज सुमारे ८० ते ९० किलो तरंगता कचऱ्याचे संकलन केले जाते.
बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर आणि उपनगरे) स्वच्छता राखण्यासाठी तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर यांच्या देखरेखीत विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर, उपायुक्त (परिमंडळ-१) श्रीमती चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनात आणि सहायक आयुक्त (ए विभाग) श्री. गजानन बेल्लाळे यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेच्या ‘ए’ विभागातील भारताचे प्रवेशद्वार आणि बधवार पार्क परिसरात दोन मानवरहित विद्युत नाव (इलेक्ट्रिक बोट) कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. ही नाव पूर्णपणे विद्युत ऊर्जेवर चालणारी असून पर्यावरणपूरक आहे. यामध्ये वाहन वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (व्हिटीएमस) आणि जागतिक स्थाननिर्धारण प्रणाली (जीपीएस) असून याद्वारे नावेचे मार्गक्रमण, कार्यक्षेत्र आणि सुरक्षिततेबाबत नियंत्रण करता येते. समुद्रातील विविध प्रकारचा तरंगता कचरा संकलनाचे कार्य ही नाव अधिक प्रभावी आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यास सक्षम आहे.KK/ML/MS