ग्रॅच्युईटीसाठी बेस्टची पुन्हा पालिकेकडे धाव!

 ग्रॅच्युईटीसाठी बेस्टची पुन्हा पालिकेकडे धाव!

मुंबई प्रतिनिधी : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत ग्रॅच्युटी आणि अंतिम देयकांसाठी आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमाने पुन्हा एकदा मुंबई महापालिकेकडे मदतीचा हात पुढे केला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी, नवीन बसेस खरेदी आणि परिवहन विभागाच्या तुटीची भरपाई करण्यासाठी निधी मिळावा यासाठी पालिकेला नव्याने पत्रव्यवहार करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

बेस्टच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत उपदान (ग्रॅच्युटी) आणि अंतिम देयकांसाठी १,५०२ कोटी रुपयांची तर परिवहन विभागाच्या बस संचालनासाठी येणाऱ्या तुटीसाठी २,४३९ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. अशाप्रकारे एकूण ३,९४१ कोटी रुपयांचे अनुदान देण्याची मागणी बेस्टने महापालिकेकडे केली होती.
मात्र महापालिकेने हा प्रस्ताव फेटाळत निधी उभारणीसंदर्भात काही सूचना केल्या होत्या. प्रशासनाने त्या सूचनांची अंमलबजावणी करूनही अपेक्षित निधी मिळवण्यात यश आलेले नाही. त्यामुळे २०२५-२६ या वर्षाचे सुधारित अंदाज आणि २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजांना महापालिकेच्या अंतिम मान्यतेच्या अधीन राहून बेस्ट समितीची मंजुरी घेण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला.
या चर्चेदरम्यान सदस्य सुनील गणाचार्य यांनी पालिका निधी देण्यास तयार नसताना पुन्हा प्रस्ताव पाठविणे योग्य ठरणार नसल्याचे मत व्यक्त केले. हा प्रश्न सर्वांनी मिळून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, समिती अध्यक्षांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हालअपेष्टांकडे लक्ष वेधले. “ग्रॅच्युटी आणि शिल्लक रक्कम मिळवण्यासाठी ज्येष्ठ कर्मचारी काठी टेकत बेस्ट कार्यालयात येत आहेत. त्यांना न्याय मिळायला हवा,” असे सांगत त्यांनी पालिका प्रशासनाकडे पुन्हा पत्रव्यवहार करण्याच्या सूचना दिल्या.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *