पालघर जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात ; १३ जणांचा मृत्यू
पालघर, दि. १८ : आज सायंकाळी अंदाजे ४:०० वाजण्याच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण रस्ता अपघातामध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला असून चौदा जण जखमी झाले आहेत. ही घटना धानीवारी गावाच्या हद्दीत घडली.
प्राथमिक माहितीनुसार, साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी प्रवास करणारे अंदाजे ३० ते ४० प्रवासी घेऊन जाणारा आयशर टेम्पो (नोंदणी क्रमांक MH 48 DC 7474) मुंबई-गुजरात मार्गावर उलट्या दिशेने जात होता. गावाजवळ पोहोचल्यावर समोरून येणाऱ्या ट्रेलरने (नोंदणी क्रमांक NL 01 AC 9118) नियंत्रण गमावले. ट्रेलरच्या कंटेनर बॉक्सने आयशर टेम्पोच्या डाव्या बाजूस जोरदार धडक दिली. तसेच एक मोटारसायकल (नोंदणी क्रमांक MH 04 EM 8425) देखील या अपघातात सापडली.
या अपघातात १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्रशासनाने पुष्टी केली आहे. बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदतकार्य सुरू केले दरम्यान मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी पाच लाख इतकी मदत जाहीर केली आहे.
- १४ जखमींना तातडीच्या उपचारांसाठी डहाणू येथील वेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- इतर जखमी प्रवाशांना पुढील उपचारांसाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मृत व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
- सुरेश रत्ना लाखत
- पांडू गणपत लाखत
- काळू गोविंद लाखत
- सुनील अर्जुन दांडेकर
- चिमा गोविंद कुरहाडा
- नमिता विठ्ठल दांडेकर
- सारिका संतोष लाखत
- आयुष सिताराम लाखत
- सागर नामदेव शेंडे
- वंदना शिवराम वळवी
- सलोनी शिवराम वळवी
- अजय अहाडी
- रियांक्षी संतोष लाखत
जिल्हा प्रशासन व स्थानिक पोलीस यंत्रणा घटनास्थळी उपस्थित असून मदतकार्य तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी समन्वय साधत आहेत.
या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचे पालघर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तपासातील पुढील माहिती तसेच जखमींच्या प्रकृतीबाबतची अद्ययावत माहिती वेळोवेळी देण्यात येईल. अधिक माहितीसाठी अथवा संबंधित माहिती देण्यासाठी नातेवाईकांनी डॉ. सचिन वाघमारे यांच्याशी ९४२१४८५५०४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.ML/ML/MS