नरेंद्र मोदींचे अहंकारी सरकार देशातील लोकशाहीला घातक

 नरेंद्र मोदींचे अहंकारी सरकार देशातील लोकशाहीला घातक

मुंबई , दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): २०१४ पासून देशातील राजकीय चित्र बदलले असून दबावाचे, दडपशाहीचे राजकारण सुरु झाले आहे. मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याचा आवाज बंद केला जातो. देशात जुलमी ब्रिटीशांप्रमाणे राज्यकारभार सुरु असून आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हे चित्र बदलण्याची गरज आहे. मोदींचा अहंकार लोकशाहीला घातक आहे, हे अहंकारी सरकार घालवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे त्यासाठी स्वातंत्र्य चळवळीप्रमाणे जात- धर्म विसरून एकत्रित लढा द्यावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

पुणे शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रागतिक तसेच पुरोगामी विचारांच्या संस्था तसेच पक्ष यांच्या पदाधिकारी , कार्यकर्त्यांसोबत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नाना पटोले बोलत होते. या बैठकीला पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, पुणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. संजय जगताप, माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे, कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार उल्हास पवार आदी उपस्थित होते.

यावेळी नाना पटोले पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्यामध्ये अहंकार भरलेला आहे, संसदेत अविश्वास ठरावावर बोलताना राहुल गांधी यांनीही या अहंकाराची देशाला होत असलेल्या धोक्याची जाणीव करून दिली. नरेंद्र मोदी स्वतःला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापेक्षाही मोठे समजू लागले आहेत. हा अहंकार लोकांना आवडत नाही, मोदींच्या लोकप्रियतेमध्ये दररोज घसरण होत आहे. संसदेत राहुल गांधी यांनी ३४ मिनिटांचे भाषण केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ तासापेक्षा जास्त भाषण केले पण जगभरातील लोकांनी राहुल गांधी यांच्याच भाषणाला जास्त पसंती दिली.

मोदींच्या भाषणकडे जनतेने दुर्लक्ष केले, जनता मोदी सरकारला कंटाळली आहे त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत सर्वांनी एकत्रित येऊन लढा दिला तर देशात परिवर्तन होण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही.

स्वातंत्र्य चळवळीत अनेक व्यक्ती, सामाजिक संघटनांनी घरावर तुळसीपत्र ठेवून मोठा संघर्ष केला, त्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले, हा त्याग आणि बलिदान याचा विसर पडता कामा नये. आजही सामाजिक संघटनांची भूमिका महत्वाची आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा पुण्यात आले त्याला काही संघटनांनी विरोध केला त्याचा संदेश देशभरात गेला. आताही आपल्याला या हुकुमशाही शक्तीच्या विरोधात एकत्र येऊन लढायचे आहे, असे नाना पटोले म्हणाले.

प्रदिप कुरुलकरला वाचवण्यासाठी देशद्रोहाचा कायदा रद्द

पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, देशातील महत्वाची आणि गोपनीय माहिती दुश्मन देशाला पुरवणारा व्यक्ती हा देशद्रोहीच आहे. प्रदीप कुरुलकर यानेही अत्यंत गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे, पण त्याच्यावर अजून देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही. प्रदीप कुरुलकर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असल्याचे उघड झाले आहे, त्याला वाचवण्यासाठीच केंद्रातील भाजपा सरकार प्रयत्न करत असून त्याचाच भाग म्हणून देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

भाजपा सरकारमध्ये वेगवेगळ्या वेगवेगळा कायदा लावला जातो. संभाजी भिडे जाहीरपणे दुसऱ्याच्या धर्मावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करतो पण त्याच्याविरोधात कारवाई केली जात नाही कारण भाजपाला तेच हवे आहे. जनतेच्या प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपा या लोकांच्या माध्यमातून जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवर प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केलेली असून मित्रपक्षात काय चालले आहे त्यात आम्हाला काही रस नाही, जे पक्ष भाजपाविरोधात लढण्यासाठी काँग्रेसबरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन लढणार आहोत आणि शरद पवार या लढाईत काँग्रेसबरोबर असतील असा आमचा विश्वास आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

ML/KA/PGB 12 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *