मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे लोकार्पण

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई बंदरावर नव्याने विकसित करण्यात आलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलमध्ये (प्रवासी जलवाहतुकीचा औपचारिक शुभारंभ करण्यात आले आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते क्रूझ टर्मिनलचे लोकार्पण करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यात बोलताना सोनोवाल म्हणाले, “मुंबईचा सागरी इतिहास आणि व्यवसाय हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘भारत हा जागतिक क्रूझ हब व्हावा’ हे स्वप्न या टर्मिनलच्या माध्यमातून साकार होत आहे.”
हे नवीन क्रूझ टर्मिनल Cruise India Mission अंतर्गत विकसित करण्यात आले आहे. मुंबईतील बॅलार्ड पियर परिसरात 4,15,000 चौरस फूट क्षेत्रात हे उभे करण्यात आले आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी 556 कोटी रुपये गुंतवले गेले आहेत. या संपूर्ण उपक्रमाचा समावेश ‘क्रूझ भारत मिशन’मध्ये असून, 2029 पर्यंत देशात 10 आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल्स, 100 नदी टर्मिनल्स, 5 मरीनाज, 500 किमी जलमार्गांचं एकत्रीकरण, 10 दशलक्ष समुद्री प्रवासी आणि 1.5 दशलक्ष नदी प्रवासी यांसह 4 लाख रोजगार निर्मितीचं लक्ष्य आहे.
वैशिष्ट्ये
- हे देशातील सर्वात मोठे जागतिक दर्जाचे टर्मिनल आहे.
- दररोज 10 हजार प्रवासी व दरवर्षी 10 लाखांहून अधिक प्रवाशांची हाताळणी करण्याची क्षमता
- टर्मिनलमध्ये 72 चेक-इन आणि इमिग्रेशन काउंटर, एकाच वेळी 5 क्रूझ जहाजांना थांबण्याची सुविधा,
- 11 मीटर खोलीचा आणि 300 मीटर लांबीचा धक्का, तसेच 300 पेक्षा जास्त वाहने ठेवता येतील असा बहुस्तरीय वाहनतळ उभारण्यात आला आहे.