मेट्रो मार्गिकेवर महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी टप्पा ; ४२ मीटर स्टील स्पॅनची यशस्वी उभारणी
मुंबई दि २६ : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुमारे १४.५ किमी लांबीच्या मुंबई मेट्रो लाईन ६ प्रकल्पात महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी टप्पा गाठत, या मार्गावरील अत्यंत जटिल कामांपैकी एक यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. जोगेश्वरी परिसरात पश्चिम रेल्वेच्या कार्यरत मार्गावर अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत महत्त्वाच्या पियरची उभारणी तसेच पहिल्या स्टील कॉम्पोझिट स्पॅनची यशस्वी स्थापना करण्यात आली आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये :
- लांबी : १४.५ किमी (पूर्णपणे उन्नत)
- स्थानके : १३
- लाईन रंग : पिंक लाईन
- डेपो : कांजूरमार्ग (१५.२ हेक्टर)
- जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड मार्गावर मेट्रो लाईन ६ सोबत डबल डेकर उड्डाणपूल
- सद्यस्थिती : ८७.७% सिविल काम पूर्ण
सक्रिय रेल्वे मार्गातील गुंतागुंतीचे उपसंरचना काम
या टप्प्याची सुरुवात पियर P124 च्या उभारणीने झाली, जो मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या उपनगरी रेल्वे मार्गांपैकी एका मार्गावरील अप-थ्रू आणि डाउन-थ्रू ट्रॅकदरम्यान स्थित आहे.
अत्यंत मर्यादित जागा आणि उच्च जोखमीच्या परिस्थितीत हे काम करताना काटेकोर नियोजन, समन्वय आणि कठोर सुरक्षा निकषांचे पालन आवश्यक होते. पायाची कामे आणि पियर कॅप स्तरापर्यंतची सर्व कामे रेल्वेच्या सुरक्षा मानकांनुसार आणि मंजूर निकषांनुसार पूर्ण करण्यात आली.
दोन्ही बाजूंनी सतत रेल्वे वाहतूक सुरू असतानाही कोणताही व्यत्यय न आणता हे काम पार पाडण्यात आले. या टप्प्यातील प्रमुख आव्हाने अशी होती :
- रात्रीच्या मर्यादित वेळेत काम करणे
- सतत सुरू असलेली रेल्वेची अखंडित वाहतूक
- अत्यंत नियंत्रित अंमलबजावणी आणि बारकाईने देखरेख
- सुरक्षा निकषांचे कठोर पालन
४२ मीटर स्टील कॉम्पोझिट गर्डर स्पॅनची उभारणी
पियर P124 पूर्ण झाल्यानंतर, पियर P123 आणि P124 दरम्यान पहिला स्टील कॉम्पोझिट गिर्डर स्पॅन उभारण्यात आला.
या स्पॅनची वैशिष्ट्ये :
- लांबी : ४२ मीटर
- वजन : सुमारे १६८.९६ मेट्रिक टन
- रचना : मुख्य गर्डर्स , क्रॉस गर्डर्स आणि ब्रेसींग घटकांचा समावेश असलेली कॉम्पोझिट स्टील प्रणाली
ही उभारणी सुमारे १० तासांच्या नियोजित रेल्वे ब्लॉकमध्ये पूर्ण करण्यात आली, ज्यातून नियोजन आणि अंमलबजावणीची उच्च कार्यक्षमता दिसून येते.
मर्यादित परीस्थित अत्यंत अचूक क्रेन ऑपरेशन
या कामासाठी ५०० टन आणि ६०० टन क्षमतेच्या हायड्रॉलिक क्रेन्सचा समन्वित वापर करण्यात आला. जागेच्या मर्यादेमुळे क्रेन्स कार्यरत रेल्वे ट्रॅकदरम्यान उभ्या करण्यात आल्या, ज्यामुळे हे काम अत्यंत जटिल आणि अचूकतेची मागणी करणारे ठरले.
सुमारे १०–१२ मीटर उंचीवर हा स्पॅन यशस्वीरित्या बसवण्यात आला आणि सर्व सुरक्षा मानकांचे पालन करण्यात आले.
पूर्ण काम पुढील बाबींनुसार पूर्ण झाले :
- नियोजित रेल्वे ब्लॉक कालावधीत
- काटेकोर नियोजन आणि समन्वयासह
- सर्व सुरक्षा निकषांचे पालन करून
- रेल्वे वाहतुकीवर कोणताही अतिरिक्त परिणाम न करता.
हा टप्पा मेट्रो लाईन ६ वरील सर्वात आव्हानात्मक रेल्वे क्रॉसिंगपैकी एक यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे द्योतक आहे. पश्चिम रेल्वेच्या समन्वय आणि सहकार्यामुळे हे शक्य झाले.
मेट्रो मार्गिका ६ इंटरचेंज कनेक्टिव्हिटी :
- आदर्श नगर येथे मेट्रो लाईन २अ
- जेव्हीएलआर येथे मेट्रो लाईन ७
- सीप्झ परिसरात मेट्रो लाईन ३
- कांजूरमार्ग (प) येथे मेट्रो लाईन ४
- जोगेश्वरी व कांजूरमार्ग येथे उपनगरी रेल्वे
पूर्व–पश्चिम कनेक्टिव्हिटीला चालना
स्वामी समर्थ नगर (लोखंडवाला) ते विक्रोळीला जोडणारी मेट्रो मार्गिका ६ ही शहरातील पूर्व–पश्चिम दळणवळण सुधारण्यासाठी महत्त्वाची प्रकल्प आहे.
ही मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर :
- प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल
- जेव्हीएलआरसारख्या प्रमुख मार्गांवरील वाहतूककोंडी कमी होईल.
- इतर मेट्रो मार्ग आणि उपनगरी रेल्वेशी एकात्मिक जोडणी होईल.
- सुरक्षित, विश्वासार्ह आणि आरामदायी प्रवास सुविधा उपलब्ध होईल.
- खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन पर्यावरणीय शाश्वततेला चालना मिळेल.
हा टप्पा एमएमआरडीएच्या दाट शहरी परिसरात अत्यंत जटिल प्रकल्प अचूकता, सुरक्षा आणि कार्यक्षमतेने पूर्ण करण्याच्या क्षमतेचे द्योतक आहे.ML/ML/MS