NCERT च्या पुस्तकातून बाबरी मशिदचा उल्लेख वगळला

 NCERT च्या पुस्तकातून बाबरी मशिदचा उल्लेख वगळला

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : NCERTने १२ वीच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात काही बदल केले आहेत. काही ऐतिहासिक घटनांचा उल्लेख यातून वगळण्यात आला आहे, तर काही घटनांच्या मांडणीत बदल करण्यात आला आहे. अयोध्या वादावरचा इतिहास चार पानांवरून दोन पानांवर आणला गेला आहे. २०१४ पासून चौथ्यांदा एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. एप्रिलमध्येच या नव्या बदलांची घोषणा करण्यात आली होती. ताज्या घडामोडींचा समावेश करून अभ्यासक्रमात दुरुस्ती करण्यात येईल, असे एनसीईआरटीकडून सांगण्यात आले होते.

नव्या पाठ्यपुल्तकातील महत्त्वाचे बदल

  • बाबरी मशिदीचा उल्लेख वगळून त्याजागी ‘तीन घुमट असलेला ढाचा’ असा उल्लेख करण्यात आला आहे. अयोध्या प्रकरणात भाजपाची सोमनाथ ते अयोध्या रथ यात्रा, कारसेवकांची भूमिका, बाबरी मशिदीचे पतन झाल्यानंतर उसळलेली हिंसा, भाजपाशासित राज्यात राष्ट्रपती राजवट आणि अयोध्येतील हिंसाचारानंतर भाजपाने व्यक्त केलेला खेद या घटनांचा उल्लेख या धड्यात करण्यात आला आहे.
  • १६ व्या शतकात मुघल बादशहा बाबरचा सेनापती मीर बाँकी याने बाबरी मशीद बांधली, असा १२वीच्या जुन्या पुस्तकात संदर्भ होता. हा संदर्भ बदलून आता नमूद केले आहे की, १५२८ मध्ये श्रीराम यांच्या जन्मस्थानी तीन घुमट असलेला ढाचा उभारण्यात आला होता. मात्र या ढाच्यावर हिंदू देव-देवतांच्या आकृत्या आत आणि बाहेर स्पष्ट दिसत होत्या.
  • आधीच्या पुस्तकात फैजाबाद (आता अयोध्या) जिल्हा न्यायालयाने फेब्रुवारी १९८६ साली मशिदीचे टाळे उघडण्याची परवानगी दिल्यानंतर दोन्ही बाजूंनी झालेल्या हालचालींची माहिती दिली होती. तसेच जातीय हिंसाचार, रथयात्रा, १९९२ साली झालेले मशिदीचे पतन, त्यानंतर जानेवारी १९९३ मध्ये उसळलेला हिंसाचार यासंबधी माहिती दिली होती.

नव्या पुस्तकात अयोध्या वादाचा उल्लेख एका उताऱ्यात करण्यात आला आहे. “१९८६ साली फैजाबाद जिल्हा न्यायालयाने तीन घुमट असलेल्या ढाच्याचे टाळे उघडण्याचा आदेश दिला. त्यामुळे लोकांना त्याठिकाणी प्रार्थना करण्याची संधी मिळाली. ही तीन घुमट असलेली वास्तू श्रीराम यांच्या जन्मस्थानी बांधली असल्याचे मानले जाते. राम मंदिराचा शिलान्यास झाला, मात्र पुढे राम मंदिर बांधण्यास मनाई होती. हिंदू समुदायाला याबाबत चिंता वाटत होती. तर मुस्लीम समुदाय या वास्तूवर ताबा मिळविण्याची मागणी करत होता. जागेच्या हक्कांवरून दोन्ही समुदायांमध्ये तणाव वाढल्यानंतर प्रकरण न्यायालयात गेले. १९९२ साली सदर वास्तूचे पतन झाल्यानंतर अनेक समीक्षकांनी हा भारतीय लोकशाहीच्या तत्त्वांना धक्का असल्याचे विवेचन केले होते”.

नव्या पुस्तकात अयोध्या वादावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचाही उल्लेख करण्यात आला आहे. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ही जमीन हिंदू पक्षकारांची असल्याचा निकाल दिला. जुन्या पुस्तकात ७ डिसेंबर १९९२ रोजी छापून आलेल्या बातम्यांची कात्रणेही देण्यात आली होती. या बातमीचे शीर्षक होते, “बाबरी मशिदीचे पतन, केंद्राकडून कल्याण सरकार बरखास्त” तसेच १३ डिसेंबर १९९२ रोजीचे एक कात्रण होते. ज्यामध्ये भाजपाचे नेते अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, “अयोध्येत भाजपाचे गणित चुकले” नव्या पुस्तकात ही कात्रणे वगळण्यात आली आहेत.

SL/ML/SL

16 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *