जुन्या पेन्शन योजनेसाठी केंद्राकडून खुशखबर

नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागील महिन्यात दिलेले आश्वासन पूर्ण करत पेन्शन योजनेबाबत एका समितीची स्थापना केली आहे. नव्या आणि जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असताना अर्थ मंत्रालयाने पेन्शन व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी ही समिती स्थापन केली आहे. वित्त सचिव टीव्ही सोमनाथन यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या नॅशनल पेन्शन सिस्टीमच्या (NPS) सध्याच्या रचनेत काही बदल करणे आवश्यक आहे की नाही, याबाबत सूचनणार आहे. त्यामुळे आता ही समिती आपला काय अहवाल देते, याची उत्सुकता आहे.
सरकारी कर्मचारी नाराज असल्याने आता पेन्शन योजनेत काही बदल करता येतात का, याची चाचपणी करण्यात येणार आहे. त्यामुळे NPS अंतर्गत समाविष्ट कर्मचार्यांच्या पेन्शन लाभांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीकोनातून समिती त्यात सुधारणा करण्याबाबत सूचना देईल. सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (DOPT), विशेष सचिव, खर्च विभाग आणि अध्यक्ष, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) सदस्य म्हणून असतील.
देशात काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. त्यामुळे अन्य राज्यांतूनही जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी की नाही, याचा आढावा घेणार आहे.
SL/KA/SL
7 April 2023