‘पीएम व्हिजन टू आर्ट’ टर्न व्हिजन इन टू आर्ट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा जल्लोषात संपन्न

 ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ टर्न व्हिजन इन टू आर्ट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा जल्लोषात संपन्न

मुंबई, दि २२

लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने संपूर्ण भारत देशात ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी मुंबई येथे राज्याचे संस्कृतीक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ७५ विजेत्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात मा. मंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक विभाग सचिव किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रनगरी व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर कॉफी टेबल बुकचे अनावरण करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, “मला जाणीवपूर्वक याचा उल्लेख करावा लागेल की, आपल्या देशातील युवकांमध्ये, युवतींमध्ये किंवा नागरिकांमध्ये प्रचंड सृजनशीलता, नाविन्यता, कौशल्यता आणि कल्पकता आहे. माननीय पंतप्रधान मोदीजी नेहमी म्हणतात, एक सॉफ्ट पॉवर या पद्धतीची ताकद आपल्या भारतामध्ये आहे. त्याचं चित्र आणि अनुभूती आपल्याला प्रदर्शनाला भेट दिल्यावर येते.”

मंत्री शेलार पुढे म्हणाले की, “पंतप्रधानांचे संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित आहे. जगभरातल्या प्रवासात त्यांना ज्या काही भेटवस्तू मिळतात त्या भेट वस्तू सुद्धा जाहीर लिलाव करून, त्यातून उभा राहणार निधी हा प्रधानमंत्री राहत कोशमध्ये दिला जातो. आजपर्यंत एकही महिन्याचे मानधन किंवा पगार मुख्यमंत्री असल्यापासून पंतप्रधान असेपर्यंत या व्यक्तीने घेतलाच नाही. आपला पगार देखील राहत कोशमध्ये दिला. एक असा पंतप्रधान, की ज्याने एक दिवस देखील सुट्टी घेतली नाही. या दृष्टीने या कल्पनेतून या कार्यक्रमाचे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सांस्कृतिक विभाग आणि चित्रनगरी विभागाने यासाठी प्रयत्न केले.”

“ही प्रदर्शनी इतर ठिकाणी देखील मांडण्यात येईल. चित्रनगरी सरकारी कंपनी आहे. यातून जे उत्पन्न मिळते ते देखील विविध सामाजिक कार्यांसाठी वापरले जाते. यातून येणारा सीएसआर सात संस्थांना ६५ लाख रुपये देण्यात येत आहेत. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळो.” अशा शब्दात मंत्री आशिष शेलार यांनी गौरव केला.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांस्कृतिक विभागाचे सचिव किरण कुलकर्णी म्हणाले की, “बक्षीस म्हणून दिला जाणारा निधी असो किंवा संस्थांना सामाजिक बांधिलकी म्हणून दिलेला निधी असो. आपल्या सर्वांचे ध्येय एक आहे ते म्हणजे आपला देश. याच प्रतिबिंब चित्रप्रदर्शनात पाहायला मिळाले.” या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दादासाहेब फाळके चित्रनगरी व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील यांनी केले.JS/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *