डोंगराळ माळरानावर बहरली आमराई

 डोंगराळ माळरानावर बहरली आमराई

बीड दि ११…बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुका हा दुष्काळी पट्ट्यात येत असला, तरी जिद्द आणि सरकारी योजनांच्या जोरावर शेतीचे नंदनवन कसे फुलवता येते, हे पठाण मांडवा येथील शेतकरी लक्ष्मण जोगदंड यांनी दाखवून दिले आहे.
डोंगरदऱ्यात असलेल्या आपल्या ८ एकर जमिनीपैकी एका एकरात त्यांनी आंब्याची फळबाग फुलवली असून, त्यातून ते वर्षाकाठी दीड लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.

लक्ष्मण जोगदंड यांची जमीन डोंगराळ भागात असल्याने तिथे पारंपरिक पिके घेणे जिकीरीचे होते. १० वर्षांपूर्वी त्यांनी अंबाजोगाई कृषी विभागाच्या माध्यमातून फळबाग लागवड योजनेत सहभाग घेतला. एका एकरात त्यांनी ५० आंब्याची रोपे लावली होती, त्यापैकी ४० झाडे आज डौलाने उभी आहेत. या झाडांना पाणी देण्यासाठी त्यांनी नरेगा योजनेतून विहीर घेतली, जी आज त्यांच्या शेतीसाठी आधारवड ठरली आहे.
जोगदंड यांच्या बागेत केवळ एकच प्रकारचा आंबा नसून, हापूस, रत्ना, केशर, दसरी आणि लोणच्याचा आंबा अशा विविध प्रकारच्या ४० जातींची झाडे आहेत.

विशेष म्हणजे, ते कोणत्याही रासायनिक फवारणीशिवाय पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने या आंब्याचे उत्पादन घेतात. सेंद्रिय असल्याने आणि स्वतः बाजारात जाऊन थेट विक्री करत असल्याने त्यांना इतरांपेक्षा अधिक भाव मिळतो. “सुरुवातीची पाच वर्षे काहीच उत्पन्न मिळाले नाही, पण एकदा झाडे मोठी झाल्यावर आता दरवर्षी १ ते दीड लाख रुपयांची विक्री होते,” असे लक्ष्मण जोगदंड सांगतात.

या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे याला जास्त मशागत किंवा महागड्या फवारणीची गरज लागत नाही, फक्त वेळेवर पाणी दिले तरी उत्पादन शाश्वत मिळते. गेल्या पाच वर्षांत त्यांनी ५ लाखांचे उत्पन्न घेतले असून, यावर्षी आंब्याची सेटिंग उत्तम असल्याने दीड लाखाचा आकडा पार होईल, असा त्यांना विश्वास आहे.
बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करून आर्थिक प्रगती करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लक्ष्मण जोगदंड यांची ही यशोगाथा मार्गदर्शक ठरत आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *