ओशिवरा नाल्यावरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक, नवीन पुलासाठी होणार २० कोटींचा खर्च
मुंबई, दि १०: पश्चिम उपनगरातील लिंकरोडला जोडणारा महत्त्वाचा ओशिवरा नाल्यावरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल व्ही.जे.टी.आय.ने दिल्यानंतर मुंबई महापालिकेने हा जुना पूल पाडून त्याठिकाणी नवीन पूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी पालिका प्रशासन तब्बल २० कोटी ५ लाख १८ हजार रुपये खर्च करणार आहे.
महापालिकेच्या प्रमुख अभियंता (पूल) विभागामार्फत मुंबईतील पुलांचे सर्वेक्षण करण्यात येत असून, पश्चिम उपनगरांतील पुलांच्या तपासणीसाठी मे. एससीजी कन्सल्टिंग सर्व्हिसेस यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या संस्थेने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये संबंधित पुलाचा स्लॅब धोकादायक स्थितीत असल्याचे नमूद करत तो तोडून पुनर्बांधणी करण्यासह पुलाचे बिअरिंग बदलण्याची शिफारस केली होती.
ओशिवरा नाल्यावरील हा पूल पश्चिम उपनगरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने आणि पुलाची स्थिती गंभीर असल्याचे लक्षात घेता महापालिकेच्या पूल विभागाने पुनश्च स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रतिष्ठित व्ही.जे.टी.आय. संस्थेची नियुक्ती करण्यात आली.
व्ही.जे.टी.आय.च्या पुनर्परीक्षण अहवालात पुलाच्या सुपरस्ट्रक्चरचे पूर्णपणे पाडकाम करून पुनर्बांधणी करण्याची तसेच सबस्ट्रक्चरची मोठ्या प्रमाणात संरचनात्मक दुरुस्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या अहवालानंतर महापालिकेने जुना पूल हटवून नवीन पूल उभारण्याचा निर्णय अंतिम केला आहे.
पालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यास मदत होणार असून पश्चिम उपनगरातील वाहतूक अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.KK/ML/MS