ब्राह्मण सभा श्री २०२६ मध्ये अमित अनंत पांडेरे यांचा डंका
मुंबई 24 : ब्राह्मण सभा, मुंबई या संस्थेच्या साळवेकर व्यायामशाळेतर्फे रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘ब्राह्मण सभा श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत एकूण ५५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून आपल्या पिळदार शरीरयष्टीचे, मेहनतीचे आणि कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन घडविले. प्रेक्षकांनी प्रत्येक स्पर्धकाला टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत अमित अनंत पांडेरे यांनी ‘ब्राह्मण सभा श्री २०२६’ हा मानाचा किताब पटकावला.
ब्राह्मण सभा, मुंबई ही संस्था गेली अनेक वर्षे शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करत आहे. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे गेल्या काही वर्षांत या उपक्रमात खंड पडला होता. यंदा नव्या उत्साहाने, नव्या जोमाने आणि नव्या उमेदीने या स्पर्धेचे आयोजन केले गेले.
या स्पर्धेसाठी साळवेकर व्यायामशाळेचे अध्यक्ष अमोल जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील नामांकित IFBB प्रो महिला बॉडीबिल्डर दीपा सप्रे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित झाला.KK/ML/MS