अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे निधन

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर (79) यांचे बुधवारी (दि.12 एप्रिल) निधन झाले आहे. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये त्यांनी अनेक वर्षे अध्यापनाचे काम केले होते.
उत्तरा बावकर यांनी 1986 मध्ये आलेल्या ‘यात्रा’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर 1987 मध्ये आलेल्या ‘तमस’ या मालिकेने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली होती. मालिकांसह अनेक गाजलेल्या हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. ‘एक दिन अचानक’, ‘रुक्मावती की हवेली’, ‘द बर्निंग सीजन’, ‘सरदारी बेगम’ या चित्रपटांमधून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
उत्तरा बावकर यांनी सुमित्रा भावे यांच्या अनेक चित्रपटात काम केले होते. 1995 मध्ये ‘दोघी’ या मराठी चित्रपटात त्या झळकल्या होत्या. ‘वास्तूपुरुष’ (2002), ‘उत्तरायण’ (2003), ‘शेवरी’ (2006), ‘रेस्टोरेंट’ (2006) यांसारख्या मराठी चित्रपटातही त्या झळकल्या होत्या. अलीकडच्या काळात आलेल्या ‘दिठी’ या चित्रपटातही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.
SL/KA/SL
13 April 2023