सामाजिक बांधिलकीचा पुरस्कार प्रकाश सावंत यांना जाहीर ; कर्जत प्रेस क्लब करणार सन्मानित
मुंबई, दि. २२ : सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारितेचा गौरव करण्यासाठी कर्जत प्रेस क्लबतर्फे दिला जाणारा मानाचा ‘स्व. संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार २०२६’ यंदा ‘दैनिक नवशक्ति’चे संपादक प्रकाश सावंत यांना जाहीर झाला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ही निवड एकमताने करण्यात आली आहे. हा पुरस्कार सोहळा सोमवार, दि. २७ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता मंडलिक सभागृह, बडोदा बँकेजवळ, नेरळ (ता. कर्जत) येथे पार पडणार आहे. मराठी पत्रकार परिषद, मुंबईचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेशभाऊ लाड, कवी अरुण म्हात्रे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यात स्व. सुनील (दादा) दांडेकर स्मृती जिल्हास्तरीय पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार विजय मोकल (पेण) यांना, तर स्व. धर्मानंद गायकवाड स्मृती तालुकास्तरीय पुरस्कार युवा पत्रकार मोतीराम पाटोळे (कर्जत) यांना प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास जिल्ह्यातील पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.JS/ML/MS