कोकणातील दापोली तालुक्यात रुजतोय चहाचा मळा

 कोकणातील दापोली तालुक्यात रुजतोय चहाचा मळा

दापोली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चहाचा मळा म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर आसामचं नाव येतं. पण आता कोकणातील दापोली तालुक्यातील मुर्डी या समुद्रालगतच्या निसर्गरम्य गावात चहाच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी होत आहे. येथील प्रगतीशील कृषी पदवीधर शेतकरी विनय जोशी यांनी निसर्ग वादळानंतर उद्ध्वस्थ झालेल्या वाडीमध्ये चहा रोपे लागवडीचा नावीन्यपूर्ण प्रयोग केला आहे.

जोशी यांनी सव्वा एकर बागेत आसामहून आणलेल्या ६५० चहाच्या रोपांची लागवड केली आहे. गेल्या १४ महिन्यांपासून हा उपक्रम सुरू आहे. चहा रोपांची कोकणच्या मातीत उत्तम वाढ झालेली दिसून येत आहे. आसाम परिसरातील अनेक वनस्पती कोकणात देखील उगवतात. तेथील पाऊसमान, हवामान हे देखील कोकणासारखेच आहे. त्यामुळे चहा लागवडीचा हा प्रयोग कोकणातही यशस्वी होईल, असा विश्वास विनय जोशी यांनी व्यक्त केला आहे.

विनय जोशी यांनी आपल्या सामाजिक कामाच्या निमित्ताने आसाममध्ये दीर्घकाळ वास्तव्य केले आहे. तेथील निसर्ग, शेती, हवामान हे त्यांनी अनुभवले आहे. त्यामुळे आसाम व कोकण येथील अनेक गोष्टीत साधर्म्य असल्याचं ते सांगतात. त्यामुळे गेल्या वर्षभरातील रोपांची लागवड व रोपांची उत्तम असलेली सद्यस्थिती यावरून या आपल्या अनोख्या नव्या प्रयोगाला नक्कीच यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चहाची रोपे साधारण कंबरेएवढी झाल्यावर त्यांची कोवळी पाने खुडुन त्यापासून चहा पावडर तयार केली जाते. त्यामुळे या वर्षी पावसाळ्यात रोपांची योग्य वाढ झाल्यास वर्षभरात चहाची पहीली तोडणी होऊ शकते. त्यामुळे येत्या काळात कोकणात दापोली परिसरात भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आणि चहाप्रेमींसाठी जोशी यांची चहाची बाग एक आकर्षण केंद्र ठरू शकते.

SL/KA/SL

11 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *