अवकाळी ग्रस्तांची मुख्यमंत्र्यानी घेतली भेट

अहमदनगर , दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात रविवारी,९ एप्रिल रोजी वादळी वारा, गारपीटीसह झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने झालेल्या नुकसानीची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेत पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात आजच उभारणी करण्याचे आदेश दिले. वनकुटे मधील पडझळ झालेल्या २२ कुटुंबाना शबरी घरकुल योजनेमधून घरकुल तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. त्यांच्यासमवेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आदी उपस्थित होते . या पावसाने वनकुटे गावातील घरांची पडझड झाली आहे . कांदा, कलिंगड, टोमॅटो, उन्हाळी भुईमूग या पिकांसह मका, कडवळ, घास ही चारा पिके जमीनदोस्त झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावाजवळील हिरामण बन्सी बर्डे, कचरू विठ्ठल वाघ यांच्या पडझड झालेल्या घरांची पाहणी केली.
ML/KA/PGB 11 APR 2023