शिवसेनेच्या वारकरी सेवा रथाचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

मुंबई दि १८:- आषाढी वारीनिमित्त शिवसेनेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या पंढरपूर वारी २०२५ : ‘वारकरी सेवा रथाचे’ काल पंढरपूरकडे प्रस्थान झाले. उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते या रथाला भगवा झेंडा दाखवून हा रथ पंढरपूरकडे रवाना करण्यात आला.
शिवसेनेच्या आणि धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे यंदा दुसरे वर्ष आहे. वारकरी संप्रदायाची सेवा हीच पांडुरंगाची सेवा, याच भावनेतून शिवसेना यंदाच्या पंढरपूर वारीमध्ये पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना विविध सेवा पुरवण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने, आणि खासदार डॉ. श्रीकांत दादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाने, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या माध्यमातून ‘वारकरी सेवा रथ’ पंढरपूर कडे रवाना झाला आहे.
‘वारकरी सेवा रथ’ या उपक्रमाअंतर्गत पायी चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांना शारीरिक आणि मानसिक दिलासा देण्यासाठी त्यांना कापडी बुटांचे वाटप, फोड, जखमा आणि वेदना टाळण्यासाठी
विशेष ट्यूब्स,पावसाळी हवामानात संरक्षणासाठी रेनकोट आणि छत्र्या तसेच टाळ, ग्रंथ व साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी हँडबॅग्ज, वारकऱ्यांचे आरोग्य नीट रहावे यासाठी औषध आणि गोळ्यांचा पुरवठा, शुद्ध पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधा विनामूल्य पुरविण्यात येणार आहेत.
तसेच अध्यात्म आणि जनजागृतीचा समन्वय राखण्यात येणार असून या रथाच्या माध्यमातून
विविध शासकीय योजनांची माहिती, प्रबोधनात्मक कीर्तन आणि वासुदेव, गोंधळी यांच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर जनजागृती तसेच शिवसेनेने आजवर केलेल्या सामाजिक कार्याचा प्रचार प्रसार करण्यात येणार आहे. यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या विविध जनहित योजनांचा परिचय आणि लाभ थेट वारकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचे कार्यही या उपक्रमाद्वारे केले जाणार आहे.
वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना विश्रांती स्थळी पायाची मालिश करून देण्यासाठी शिवसेनेचे स्वयंसेवक तत्पर असतील. यासाठी पक्षाच्या वतीने हजारो स्वयंसेवक, युवासेना, महिला आघाडी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि सकल अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सेवा रथासोबत वारीत सहभागी होणार असल्याचे शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखाली ११२ प्रमुख सदस्यांची टीम या उपक्रमात सहभागी होणार आहे.
हा उपक्रम केवळ एखाद्या पालखीपुरता मर्यादित न ठेवता, महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पालखी सोहळ्यांत कार्यरत राहणार आहे.”महाराष्ट्रातील अनेक संतपरंपरेचे वंशज, कीर्तनकार आणि धर्माचार्य थेट या उपक्रमात सहभागी होणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे ‘वारकरी सेवा रथ’ उपक्रमास आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त होणार आहे. वारकऱ्यांच्या मनामनात शिवसेनेच्या कार्याचा ठसा कायमस्वरूपी उमटवला जावा यासाठी हाती घेण्यात आलेला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना पूर्णपणे सज्ज झाली आहे.ML/ML/MS