इराणमधील 6 अणु-लष्करी स्थळांवर इस्रायलने केला हल्ला

आज सकाळी इस्रायलने इराणच्या अणुऊर्जा आणि इतर लष्करी तळांवर मोठा हल्ला केला आहे. यामध्ये २ उच्च इराणी लष्करी अधिकारी आणि २ अणुशास्त्रज्ञ ठार झाले आहेत. एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने न्यू यॉर्क टाइम्सला सांगितले की, राजधानी तेहरानमधील शहराक शाहिद महालती नावाच्या ठिकाणी हा हल्ला झाला. येथे उच्चपदस्थ इराणी लष्करी अधिकारी राहतात. हल्ल्यात ३ इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.
इस्रायली लष्करी अधिकाऱ्याने असा दावा केला की, इराण गुप्तपणे अण्वस्त्रे विकसित करत आहे आणि काही दिवसांत १५ अण्वस्त्रे बनवण्याइतपत साहित्य त्यांच्याकडे आहे. हे थांबवण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. इस्रायली सैन्याने म्हटले की हा एक ‘प्री-एम्पटिव स्ट्राइक’ होता. म्हणजेच, इराण कोणतीही मोठी कारवाई करू नये म्हणून धोका ओळखल्यानंतर इस्रायलने हल्ला केला. भविष्यात असे अनेक हल्ले होऊ शकतात असेही इस्रायली सैन्याने म्हटले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की इराण गुप्तपणे अण्वस्त्रे बनवत आहे. हा आपल्या देशासाठी धोका होता. म्हणूनच आपल्या सैन्याने नतान्झसारख्या महत्त्वाच्या अण्वस्त्र स्थळांवर आणि काही प्रमुख इराणी शास्त्रज्ञांवर हल्ला केला. अमेरिकेने या हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचे स्पष्ट केले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले की, इस्रायलने हा हल्ला स्वसंरक्षणार्थ केला आहे आणि त्यांनी इराणला कोणत्याही परिस्थितीत अमेरिकन सैनिकांना किंवा तळांना लक्ष्य करू नये असा इशारा दिला.
हा हल्ला अशा वेळी झाला जेव्हा अमेरिका आणि इराणमध्ये अणुकराराबाबत चर्चा सुरू होती. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी इस्रायलला हल्ला करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता कारण त्यांना भीती होती की यामुळे चर्चा थांबू शकते. या तणावादरम्यान अमेरिकेने इराकमधून आपल्या राजदूतांना परत बोलावले होते. अमेरिकेने मध्य पूर्वेत असलेल्या आपल्या सैनिकांच्या कुटुंबियांनाही परतण्याची परवानगी दिली. सध्या, पर्शियन आखात आणि आसपासच्या भागात सुमारे ४०,००० अमेरिकन सैनिक तैनात आहेत.