GST संकलनात १०% वाढ

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विक्रमी GST संकलनामुळे सरकारच्या तिजोरीत उत्तरोत्तर चांगली भर पडत आहे. नवीन वर्षातही जीएसटी संकलनात वाढ होण्याचा ट्रेंड कायम आहे. सरकारला जानेवारी महिन्यात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मधून तब्बल 1.72 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. आजपर्यंतचा हे दुसरे सर्वोच्च जीएसटी संकलन आहे. यापूर्वी एप्रिल 2023 मध्ये सर्वाधिक 1.87 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते.जानेवारी 2024 चे जीएसटी संकलन एका वर्षापूर्वी म्हणजेच जानेवारी 2023 च्या तुलनेत 10.4 टक्के अधिक आहे.
मागील वर्षी जीएसटीमधून 1.55 लाख कोटी रुपये जमा झाले होते. तर एका महिन्यापूर्वी डिसेंबर 2023 मध्ये सरकारला जीएसटीमधून 1.65 लाख कोटी रुपये मिळाले होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी संकलन वाढल्याचे स्वागत केले आहे. त्या म्हणाल्या की, हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या ताकदीचे लक्षण आहे. जीएसटी प्रणाली आणखी सुलभ करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये तिसऱ्यांदा जीएसटी संकलन 1.7 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. सलग 11 महिने जीएसटीतून 1.5 लाख कोटींचा महसूल मिळाला आहे. याशिवाय सलग 22 महिन्यांपासून देशाचे जीएसटी संकलन 1.4 लाख कोटी रुपयांच्या वर राहिले आहे. जानेवारी 2024 मध्ये एकूण जीएसटी संकलनात केंद्रीय जीएसटी (CGST) 43,552 कोटी रुपये, राज्य जीएसटी (SGST) 37,257 कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत एकूण 16.69 लाख कोटी रुपयांचे उत्पन्न जीएसटीतून मिळाले आहे. हा आकडा आर्थिक वर्ष 2022-23 एप्रिल 2022 तेजानेवारी 2023 या कालावधीतील 14.96 लाख कोटींच्या जीएसटी संकलनापेक्षा 11.6 टक्के अधिक आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत वित्तीय तूट 9.82 लाख कोटी रुपये राहिली आहे. ही रक्कम वित्तीय तुटीच्या वार्षिक अंदाजाच्या 55 टक्के आहे. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट जीडीपीच्या 5.9 टक्के राहण्याचा अंदाज सरकारने वर्तवला असून सरकार हे उद्दिष्ट गाठेल अशी अपेक्षा आहे.
SL/KA/SL
2 Feb. 2024