रे रोड स्मशानभूमीतील गंभीर गैरप्रकार चव्हाट्यावर! नोंदणी रजिस्ट्रार दारूच्या नशेत

 रे रोड स्मशानभूमीतील गंभीर गैरप्रकार चव्हाट्यावर! नोंदणी रजिस्ट्रार दारूच्या नशेत

मुंबई, 26
रे रोड येथील मुख्य स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांच्या कारभाराबाबत स्थानिक नागरिकांच्या गेल्या अनेक दिवसापासून अनेक तक्रारी महापालिका प्रशासनाकडे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींकडे प्राप्त होत्या. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाकडून कोणतीच कारवाई झाली नाही. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन आल्यानंतर तेथील नोंदणी रजिस्ट्रार दारूच्या नशेत असल्याचे नागरिकांकडून वारंवार सांगण्यात येत होते.
यानंतर स्थानिक रहिवाशांनी माजी आमदार यामीनीताई जाधव यांच्याकडे या गंभीर विषयाची तक्रार केली. त्यानंतर जाधव यांनी तक्रारींची दखल घेत आज स्मशानभूमीला अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी सुरक्षारक्षकही आपल्या नेमून दिलेल्या जागेवर नसून केबिनमध्ये बसून कुरकुरे खात असल्याचे दिसून आले. चौकशीदरम्यान रजिस्ट्रार दारू पीत असल्याचे सुरक्षारक्षकाने सांगितले आणि दारूची बाटलीही आणून दिली.

रजिस्ट्रारच्या या गैरवर्तनामुळे अनेकदा मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनाच स्वतः पुढाकार घेऊन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागत असल्याचेही समोर आले. दुःखाच्या प्रसंगी आधीच मानसिक तणावात असलेल्या कुटुंबीयांना अशा प्रकारे त्रास सहन करावा लागणे अत्यंत दुर्दैवी आहे.

स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणीही कर्मचाऱ्यांकडून अशी बेजबाबदार वर्तणूक होत असेल, तर हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि स्मशानभूमीतील कामकाज शिस्तबद्ध व जबाबदारीने चालेल याची प्रशासनाने खात्री करावी. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि महापौर रितू ताई तावडे यांना गंभीर तक्रार केली असून या तक्रारीची लवकरच कायदेशीर कारवाई होईल अशी माहिती माजी आमदार, नगरसेविका यामिनीताई जाधव यांनी दिली.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *