पावसाळ्याआधी आरोग्य विभागातील रिक्त पदे भरा!म्युनिसिपल युनियनची मागणी
मुंबई, दि १९: मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातील विविध संवर्गातील मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांमुळे पावसाळ्यात साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे दि म्युनिसिपल युनियनने स्पष्ट केले आहे. या संदर्भात युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी महापौरांकडे निवेदन सादर करून तातडीने पदभरती करण्याची मागणी केली आहे.
युनियनच्या म्हणण्यानुसार सार्वजनिक आरोग्य खात्यात कनिष्ठ अवेक्षक, स्वच्छता निरीक्षक, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, भट्टीचालक, उद्वाहन चालक आदी संवर्गातील अनेक पदे रिक्त आहेत. काही संवर्गात तब्बल ५० ते ६० टक्क्यांपर्यंत पदे रिक्त असल्याने नागरी आरोग्य सेवा आणि स्वच्छता व्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे.
कनिष्ठ अवेक्षकांच्या ३६४ मंजूर पदांपैकी २१५ पदे रिक्त असून स्वच्छता निरीक्षकांच्या १३४ पदांपैकी ८० पदे रिक्त आहेत. तसेच उद्वाहन चालक, भट्टीचालक आणि इतर संवर्गांमध्येही मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची कमतरता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या रिक्त पदांबाबत युनियनने सार्वजनिक आरोग्य खात्याकडे वारंवार पाठपुरावा केला असला तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संबंधित पदे ही महापालिकेतील निम्नसंवर्गीय अर्हताप्राप्त कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने भरली जाणारी असून अनेक कर्मचारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असल्याचे युनियनने म्हटले आहे. वेळेत पदभरती न झाल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होत असून त्यांच्यात नाराजी वाढत असल्याचेही निवेदनात नमूद आहे.
पावसाळा तोंडावर असताना मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिससारख्या साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी ही पदे तातडीने भरणे आवश्यक असल्याचे युनियनने स्पष्ट केले आहे. अन्यथा रोगराई वाढून मुंबईकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, कामकाजावर होणारा परिणाम, कर्मचाऱ्यांवरील ताण आणि संभाव्य आरोग्यधोके याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी महापौरांनी युनियनला वेळ देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.KK/ML/MS